मुंबई : कबड्डीत सुवर्णमय अष्टपैलू कामगिरी करणारा महान राष्ट्रीय कबड्डीपटू राणाप्रताप तिवारी हे २४ डिसेंबर रोजी वयाची साठी गाठून दुसरा डाव सुरु करीत आहेत. तद्प्रसंगी भावूक झालेल्या राणाप्रताप तिवारी यांनी जीवनाच्या शेवटच्या टप्प्यापर्यंत कबड्डीसाठी कार्यरत राहण्याचा निर्धार शालेय सुपर लीग कबड्डीच्या समारोपप्रसंगी व्यक्त केला. आयडियल स्पोर्ट्स अकॅडमी व शिवनेरतर्फे माजी केंद्रीय मंत्री शरद पवार यांच्या वाढदिवसानिमित्त आंतर शालेय कबड्डी स्पर्धेचा मोफत उपक्रम २ ते २२ डिसेंबरपर्यंत साकारताना राष्ट्रीय प्रशिक्षक राणाप्रताप तिवारी यांचे मार्गदर्शन देखील लाभले होते. आयडियल स्पोर्ट्स अकॅडमीतर्फे याप्रसंगी कबड्डीपटू राणाप्रताप तिवारी यांचा षष्ठब्दीपूर्ती सुवर्णपदक, सन्मानचिन्ह, शाल, श्रीफळ देऊन विशेष गौरव मुंबई मराठी पत्रकार संघाचे अध्यक्ष नरेंद्र वाबळे, शिवछत्रपती पुरस्कार विजेते लीलाधर चव्हाण आदी मंडळींच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाला.
बालपणापासूनच वरळी येथील अमरप्रेम क्रीडा मंडळातून कबड्डीचा श्रीगणेशा करणाऱ्या राणाप्रताप तिवारी यांनी सन १९८२ पासून मध्य रेल्वेतून कबड्डीची सुसाट कामगिरी केली. कबड्डीपटू, प्रशिक्षक, संघटक-विश्लेषक-समालोचक-सूत्रसंचालक असा विविध पैलूतून त्यांचा कबड्डीमधील सुवर्ण युगी प्रवास वाखाणण्याजोगा असल्याचे प्रतिपादन आयडियल स्पोर्ट्स अकॅडमीचे अध्यक्ष लीलाधर चव्हाण यांनी केले. सन १९८०-९० दशकामध्ये जय भवानी कबड्डी स्पर्धेवेळी ना.म.जोशी मार्ग-लालबागचा दर्दी कबड्डी शौकीन त्यांचा चतुरस्त्र खेळ पाहण्यासाठी क्रीडांगणाचा परिसर हाउसफुल झाल्याची आठवण लीलाधर चव्हाण यांनी सांगितली. कबड्डी कारकिर्दीत आकर्षक खेळ दर्शविण्यात राणाप्रताप तिवारी अग्रेसर राहिले. कबड्डी खेळाचा प्रचार व प्रसार होण्यासाठी आजही ते हिरीरीने कार्यरत आहेत. त्यामुळे उर्वरित आयुष्यात पूर्ण वेळ कबड्डीत रमू पाहणाऱ्या राणाप्रताप तिवारी यांचा दीर्घ अनुभव व सेवाभावी मार्गदर्शन उदयोन्मुख खेळाडूंना निश्चितच लाभदायक ठरेल. संयोजकांतर्फे अभीष्टचिंतनाची श्री सिद्धिविनायक चरणी प्रार्थना करीत लाडूंचा महाप्रसाद शालेय खेळाडूंना वाटण्यात आला.