दक्षिण आफ्रिकेचा दुसरा डाव केवळ ९९ धावांतच आटोपला. मिचेल स्टार्कने दोन गडी बाद करताना कसोटी कारकीर्दीत ३०० बळींचा टप्पा गाठला.

पहिल्या कसोटी सामन्यात दोन दिवसांतच ३४ फलंदाज गारद
ब्रिस्बेन : पूर्णपणे गोलंदाजांचे वर्चस्व राहिलेल्या पहिल्या कसोटी क्रिकेट सामन्यात ऑस्ट्रेलियाने रविवारी दुसऱ्याच दिवशी पाहुण्या दक्षिण आफ्रिकेवर सहा गडी राखून विजय मिळविला. केवळ दोन दिवसांतच दोन्ही संघांचे मिळून तब्बल ३४ फलंदाज गारद झाले. दुसऱ्या महायुद्धानंतर हा दुसरा सर्वात कमी काळ चाललेला सामना ठरला.
गॅबाची खेळपट्टी ही अधिक उसळी आणि वेगासाठी ओळखली जाते. ऑस्ट्रेलिया आणि आफ्रिका यांच्यातील पहिल्या कसोटी सामन्यासाठी वापरण्यात आलेली खेळपट्टी हिरवीगार होती. अगदी पहिल्या चेंडूपासून गोलंदाजांना मदत मिळण्यास सुरुवात झाली होती. दोन्ही संघांच्या फलंदाजांना खेळपट्टीवर टिकणे अवघड गेले. चार डावांत मिळून केवळ दोन अर्धशतके साकारली गेली.
दुसऱ्या दिवशी ५ बाद १४५ वरून पुढे खेळायला सुरुवात केल्यावर उपाहारानंतर लगेचच ऑस्ट्रेलियाचा पहिला डाव २१८ धावांत संपुष्टात आला. ऑस्ट्रेलियाला ६६ धावांची आघाडी मिळाली. पहिल्या डावात केवळ १५२ धावा करणाऱ्या दक्षिण आफ्रिकेचा दुसरा डावही पॅट कमिन्सच्या भेदक माऱ्यासमोर गडगडला. ऑस्ट्रेलियन कर्णधार कमिन्सने ४२ धावांत ५ गडी बाद केले. दक्षिण आफ्रिकेचा दुसरा डाव केवळ ९९ धावांतच आटोपला. मिचेल स्टार्कने दोन गडी बाद करताना कसोटी कारकीर्दीत ३०० बळींचा टप्पा गाठला.
विजयासाठी ऑस्ट्रेलियाला केवळ ३४ धावांचे आव्हान मिळाले. मात्र, कॅगिसो रबाडापुढे ऑस्ट्रेलियन फलंदाजांचीही कसोटी लागली. रबाडाने उस्मान ख्वाजा (२), डेव्हिड वॉर्नर (३), स्टीव्ह स्मिथ (६) आणि ट्रॅव्हिस हेड (०) यांना झटपट माघारी धाडले. मात्र, रबाडा आणि आनरिख नॉर्किए यांना पूर्ण नियंत्रणात गोलंदाजी करता आली नाही.ऑस्ट्रेलियाने ४ बाद ३५ धावा करत विजय साकारला. यातील १९ धावा या अवांतर (१५ वाईड, ४ बाईज) होत्या.
संक्षिप्त धावफलक
दक्षिण आफ्रिका (पहिला डाव) : १५२
ऑस्ट्रेलिया (पहिला डाव) : ५०.३ षटकांत सर्वबाद २१८ (ट्रॅव्हिस हेड ९२, ; कॅगिसो रबाडा ४/७६, मार्को यान्सेन ३/३२)
दक्षिण आफ्रिका (दुसरा डाव) : ३७.४ षटकांत सर्वबाद ९९ (खाया झोंडो ३६, टेम्बा बव्हुमा २९; पॅट कमिन्स ५/४२, मिशेल स्टार्क २/२६, स्कॉट बोलँड २/१४)
ऑस्ट्रेलिया (दुसरा डाव) : ७.५ षटकांत ४ बाद ३५ (मार्नस लबूशेन नाबाद ५; कॅगिसो रबाडा ४/१३)
गॅबाची खेळपट्टी वादाच्या भोवऱ्यात
ऑस्ट्रेलिया आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील पहिल्या कसोटी क्रिकेट सामन्याचा निकाल दोन दिवसांच्या आतच लागला. गॅबाच्या हिरव्यागार खेळपट्टीवर दोन्ही संघांतील गोलंदाजांनी वर्चस्व गाजवले, तर फलंदाजांना खेळपट्टीवर टिकणेही अवघड गेले. त्यामुळे आता ही खेळपट्टी वादाच्या भोवऱ्यात सापडली आहे. आफ्रिकेचा कर्णधार डीन एल्गरने ही खेळपट्टी खेळण्यासाठी पूर्णपणे सुरक्षित आहे का, अशी पंचांकडे विचारणा केली होती. तसेच एकीकडे लोकांना कसोटी क्रिकेटकडे वळवण्याचा प्रयत्न सुरू असताना दुसरीकडे अशा प्रकारच्या खेळपट्टय़ा तयार करणे कितपत योग्य आहे? असा प्रश्नही सामन्यानंतर एल्गरने उपस्थित केला. ऑस्ट्रेलियाचे माजी दिग्गज क्रिकेटपटू रिकी पॉिन्टग आणि मॅथ्यू हेडन यांनीही या खेळपट्टीवर टीका केली. ‘‘गॅबाची अशी खेळपट्टी कधीच बघितली नव्हती. या खेळपट्टीवर इतक्या मोठय़ा प्रमाणावर गवत का ठेवण्यात आले हेच कळले नाही. या खेळपट्टीचे नक्कीच परीक्षण केले जाईल,’’ असे पॉन्टिंग म्हणाला. भारताचा माजी फलंदाज वीरेंद्र सेहवाग यांनीही खेळपट्टीबाबत नाराजी व्यक्त केली. ‘‘ऑस्ट्रेलियात दीड दिवसांत संपलेल्या कसोटीबाबत आता कुणी काही बोलणार आहे का? भारतात अशा प्रकारची खेळपट्टी तयार करण्यात आली असती, तर आम्ही कसोटी क्रिकेट संपवत आहोत अशी टीका झाली असती,’’ असे सेहवाग म्हणाला.