मुंबई: विजयाचे पारडे दोलायमान होत पाच-पाच चढायांपर्यंत रंगलेल्या सामन्यामध्ये सरस्वती विद्या मंदिरने अभ्युदय विद्या मंदिरचे आव्हान केवळ एका गुणाने संपुष्टात आणले आणि शिवनेरतर्फे आयडियल स्पोर्ट्स अकॅडमी व यशस्विनी संस्थेच्या सहकार्याने माजी केंद्रीय मंत्री शरद पवार यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित शालेय सुपर लीग कबड्डीच्या मुख्य फेरीत प्रवेश केला. सरस्वती विद्या मंदिरला तिसऱ्या पश्चिम विभागीय टप्प्याचे प्रथम स्थान पटकाविताना साहिल सोलनकर, मंथन साटले यांच्या आक्रमक चढाया निर्णायक विजयासाठी उपयुक्त ठरल्या. शिवराज माने, आदर्श तांबे यांच्या दमदार चढाया अखेर अभ्युदय विद्या मंदिरसाठी निष्फळ ठरल्या.
सरस्वती विद्या मंदिरने सुरुवातीपासून आक्रमक खेळ करीत अभ्युदय विद्या मंदिर विरुद्ध मध्यंतराला १९-१५ अशी आघाडी घेतली. दुसऱ्या डावात तोडीस तोड खेळ करीत चढाईपटू शिवराज माने, आदर्श तांबे आदींनी अभ्युदय शाळेला ४४-४४ अशी बरोबरी साधून दिली. परिणामी पाच-पाच चढायांचा अलाहिदा डाव घाटकोपर येथील माणेकलाल मैदानामध्ये खेळविण्यात आला. त्यामध्ये साहिल सोलनकर, मंथन साटले यांच्या निर्णायक चढायांनी सरस्वती विद्या मंदिरला ५०-४९ अशी बाजी मारून दिली. चढाईपटू साहिल सोलनकर व शिवराज माने यांना सामन्यातील उत्कृष्ट खेळाडूचा पुरस्कार देऊन कबड्डी मार्गदर्शक सुनील खोपकर, क्रीडा शिक्षक रामदास भोकल, शिवछत्रपती पुरस्कार विजेते लीलाधर चव्हाण आदी मंडळीनी गौरविले. शालेय खेळाडूंच्या चुरसपूर्ण खेळाला प्रोत्साहन देण्यासाठी राज्य स्तरीय शालेय कबड्डी स्पर्धा आयोजित करण्याच्या प्रयत्नात शिवनेर संघटन समितीचे अध्यक्ष खा. सुनील तटकरे व कार्याध्यक्ष नरेंद्र वाबळे आहेत.
********************************************************************