मुंबई : निर्भया फंडाचा वापर शिंदे गटाच्या सुरक्षेसाठी होणे अतिशय चुक आहे. गृहमंत्र्यांनी याची चौकशी करायला हवी. परंतु गृहमंत्र्यांचा कायदा नियमाप्रमाणे चालत नाही. त्यांच्या मर्जीनुसार चालतो असे टीका राष्ट्रवादी काॅंग्रेसच्या नेत्या सुप्रिया सुळे यांनी गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर आज केली. त्या माध्यमांशी बोलत होत्या.
अतिशय दुर्दैवी
सुप्रिया सुळे म्हणाल्या, महिला सुरक्षेसाठीच्या गाड्या फक्त महिला सुरक्षेसाठीच द्यायची आहे. परंतु हे अतिशय दुर्दैवी आहे की, महिला सुरक्षेसाठी आणलेल्या गाड्या वेगळ्या कामांसाठी वापरल्या जातात. लोकप्रतिनीधींची सुरक्षा महत्वाची आहेच परंतु दुसऱ्यांचे काढून घेणे अयोग्य आहे. कुठल्याही सरकारने महिलांची सुरक्षेला प्राधान्य द्यायला हवे. व्हीआयपी कल्चर ज्या पद्धतीने होत आहे हे अतिशय दुर्दैवी आहे.
चंद्रकांत पाटील यांच्यावर शाईफेक अयोग्य
सुप्रिया सुळे म्हणाल्या, महिला अत्याचाराबाबतचे गंभीर गुन्हे फास्ट ट्रॅक कोर्टात व्हायला हवे. चंद्रकांत पाटील यांनी जे वादग्रस्त वक्तव्य केले. त्याबद्दल त्यांनी दिलगीरी व्यक्त केली. त्यामुळे आपण त्यावर पडदा टाकायला हवा. काल पिंपरी – चिंचवड येथे त्यांच्यावर जी शाईफेक झाली ती अयोग्य होती.
निषेधाच्या अनेक पद्धती
सुप्रिया सुळे म्हणाल्या, चंद्रकांत पाटील यांचा निषेध आपण वेगळ्या पद्धतीने करू शकतो. अनेक पद्धती आहेत. त्यांच्यावर शाई फेकणे योग्य नव्हते. मुळातः शाई फेकणे हे अयोग्य आहे. महाराष्ट्राच्या संस्कृतीत अशा गोष्टी बसत नाही.
गृहमंत्री नियमाप्रमाणे चालत नाहीत
गृहमंत्र्यांचा कायदा हा नियमाप्रमाणे चालत नाही. त्यांच्या मर्जीनुसार चालतो. इडीचे सरकार आहे हे ते अभिमानाने सांगतात. विरोधात बोलणाऱ्यांच्या मागे तपासयंत्रणा लावली जाते. 95 टक्के ज्या केसेस आहेत त्या विरोधीपक्षांच्या नेत्यांवर आहेत. भाजपमध्ये जर यातील एखादा गेला तर वाॅशिंगमशीनमध्ये टाकून स्वच्छ करतात.
पंतप्रधानांवर टीका
सुप्रिया सुळे म्हणाल्या, महाराष्ट्रात समृद्धी मार्गाचे उद्घाटनासाठी पंतप्रधान आले होते. त्यामुळे ते महाराष्ट्रातील गेलेल्या प्रकल्पावर बोलतील किंवा महाराष्ट्राला गिफ्ट देतील असे वाटत होते परंतु त्यांनी यापैकी काहीही केले नाही. निर्भया फंडाचा वापर शिंदे गटाच्या सुरक्षेसाठी होणे अतिशय चुक आहे. गृहमंत्र्यांनी याची चौकशी करायला हवी.
उद्धव ठाकरेंचे टीकास्त्र
ठाकरेंनीही निर्भया पथकातील वाहने आणि शिंदे गट यावर जोरदार टीकास्त्र सोडले. ते म्हणाले, “निर्भया पथकातील वाहने शिंदे गटातील आमदारांच्या सुरक्षेसाठी वापरली जाणं हा अत्यंत नीच प्रकार आहे. निर्भया पथक कशासाठी नेमली गेली हे सर्वांना माहिती आहे. महिलांच्या सुरक्षेसाठी तत्काळ मदत मिळावी, सरकार्य मिळावे, त्यांच्यावर होणारे अत्याचार रोखले जावे, त्यासाठी ही पथकं तयार करण्यात आली होती. आज त्या पथकातल्या गाड्या आमदारांच्या सुरक्षेसाठी वापरण्यात येत असेल, तर त्यांची वृत्ती काय आहे, हे आता लोकांना कळले पाहिजे”.