कणकवली/तळेरे, दि. 4 :
कलातपस्वी आप्पा काणेकर चॅरिटेबल ट्रस्टचे सन 2021-2022 चे विविध क्षेत्रातील पुरस्कार जाहिर करण्यात आले आहेत. त्यामध्ये राजेश कदम, कमलेश गोसावी, रमेश वारके, निकेत पावसकर, रुपाली पालकर, दर्शना पारकर, सुषमा गोवेकर, भालचंद्र दशावतार मंडळ यांचा समावेश आहे. पुरस्कार विजेते आणि कै. सौ. उमा महेश काणेकर स्मृतीदिनानिमित्त आयोजित निबंध स्पर्धेतील विजेत्यांना विशेष कार्यक्रमात गौरविण्यात येणार आहे.
कलातपस्वी आप्पा काणेकर यांनी आपले समग्र जीवन कलेसाठी समर्पित केले होते. त्यांच्या कलासहयोगाच्या स्मृती सदैव जागत्या ठेवाव्यात या उदात्त हेतूने ट्रस्टचे संस्थापक अध्यक्ष ललितलेखक महेश काणेकर यांनी या चॅरिटेबल ट्रस्टची स्थापना केली आहे. दरम्यान त्यांची सहचारिणी ट्रस्टच्या विश्वस्त उपक्रमशील शिक्षिका उमा काणेकर यांचे दीर्घ आजाराने निधन झाले. कै. उमा काणेकर यांच्या शैक्षणिक योगदानाची प्रेरणा नव्या पिढीतील विद्यार्थी शिक्षकांना मिळावी यासाठी गतवर्षीपासून विद्यार्थ्यांसाठी विविध स्पर्धा आयोजित करून त्यांना प्रोत्साहन दिले जाते.
यावर्षी कलातपस्वी आप्पा काणेकर स्मृती ‘उपक्रम शिक्षक पुरस्कार’ सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सामाजिक, सांस्कृतिक आणि शैक्षणिक चळवळीत स्वतंत्र ओळख निर्माण करणारे, उत्तम निवेदक राजेश कदम यांना जाहिर करण्यात आला आहे. अभ्यासू निवेदनासाठी परिचित असलेल्या राजेश कदम यांना यापूर्वी अनेक राज्यस्तरीय पुरस्कारांनी गौरविण्यात आले आहे. ‘बालसाहित्य सेवा पुरस्कार’ प्रसिध्द कवी कमलेश गोसावी यांना देण्यात येणार आहे. कमलेश गोसावी हे प्रसिध्द कवी, गीतकार आहेत. त्यांचे कविता संग्रह आणि कथा संग्रह प्रकाशित झाले असून आकाशवाणी, दूरदर्शन आणि महाविद्यालयांमध्ये त्यान्च्या कवितांचे कार्यक्रम झाले आहेत. तसेच, 2022 मध्ये नेपाळ येथे झालेल्या हिंदी शिक्षक साहित्यिक कवी संमेलनाचे अध्यक्ष पद भुषविले आहे.
कोल्हापुर येथील लेखक रमेश वारके यांना ‘साहित्य गौरव पुरस्कार’ पुरस्कार जाहिर करण्यात आला आहे. त्यांची अनेक पुस्तके प्रकाशित झाली असून अनेक ठिकाणी व्याख्याने दिली आहेत. तसेच अनेक दिवाळी अंकामधुन लेख प्रसिध्द झाले असून कोल्हापुर आकाशवाणी केंद्रावरुन त्यांचे अनेक कार्यक्रम प्रसारित झाले आहेत. ‘अक्षरघर संकल्पक पुरस्कार’ तळेरे येथील निकेत पावसकर यांना जाहिर करण्यात आला आहे. ते गेली 15 वर्षे सातत्याने विविध क्षेत्रातील मान्यवर व्यक्तींच्या हस्ताक्षरातील संदेश पत्रांचा ते संग्रह करीत आहेत. त्यांच्या संग्रहात देश विदेशातील 1700 पेक्षा जास्त व्यक्तींच्या हस्ताक्षरातील संदेश पत्रांचा संग्रह असून तळेरे येथे या संग्रहाचे ‘अक्षरघर’ निर्माण केले आहे. या अक्षरघराला नामवंत व्यक्तींनी भेट देऊन कौतुक केले आहे. त्यांच्या आकाशवाणीसह दुरदर्शन वर मुलाखती प्रसारित झाल्या आहेत.
गेली 50 वर्षे कला क्षेत्रात निस्वार्थपणे सेवा करनार्या हळवल येथील भालचंद्र दशावतार नाट्य मंडळाला ‘लोकसंगीत सेवा पुरस्कार’ जाहिर करण्यात आला आहे. संपूर्ण महाराष्ट्रासह दिल्लीतही या मंड़ळाने शासनाच्या अनेक महोत्सवात आपली कला सादर केली आहे. या मंडळाचे अध्यक्ष बी. के. तांबे यांच्या पश्चात हे मंडळ त्यांचे भाऊ, पुतण्या आणि मुलगा चालवतात. ‘आदर्श सरपंच पुरस्कार’ रुपाली राजेंद्र पालकर यांना जाहिर करण्यात आला आहे. पालकर यांनी आपल्या सरपंच पदाच्या कार्यकालात विकास कामांसोबत अनेक सामाजिक कामे केलेली आहेत.
कै. उमा काणेकर स्मृती आदर्श शिक्षिका पुरस्कार कुडाळ येथील सौ. दर्शना पारकर आणि आजरा येथील सौ. सुषमा गोवेकर यांना जाहिर करण्यात आला आहे. सौ. दर्शना पारकर ह्या पाट येथे मुख्याध्यापिका म्हणून कार्यरत असून त्यांनी मुलांच्या शैक्षणिक विकासासाठी अनेक उपक्रम राबवितात. आपला विद्यार्थी सर्वांगीण संपन्न झाला पाहिजे यासाठी त्या नेहमीच प्रयत्नशील असतात. तर सौ. सुषमा गोवेकर ह्या मुळच्या दोडामार्ग तालुक्यातील भेडशी येथील आहेत. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील विविध ठिकाणी शैक्षणिक सेवा केल्यानंतर सध्या त्या कोल्हापुर जिल्ह्यातील न्यू कसबा हायस्कूल तारळे येथे कार्यरत आहेत. शैक्षणिक उन्नती शिवाय शैक्षणिक पुरक उपक्रमात त्यांचा सहभाग दिसून येतो. आपल्या शैक्षणिक सेवेत त्यांनी अनेक विद्यार्थी घडविले आहेत. सोबत स्वत: काव्य वाचन आणि काव्य लेखनाची आवड जोपासली आहे.
या सर्व पुरस्कार विजेत्यांना लवकरच कणकवली येथे मान्यवरांच्या हस्ते पुरस्कार देऊन गौरविण्यात येणार आहे. या सर्व पुरस्कार विजेत्यांचे अभिनंदन करण्यात येत आहे.