शिवसेना नेते आदित्य ठाकरे सध्या पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत. त्याला निमित्त आहे त्यांनी बांधलेला पूल. नाशिक जिल्ह्यातील शेंद्रीपाडा या आदिवासी भागात पुराच्या पाण्यातून नागरिकानं कसरत करून चालावे लागते, म्हणून तत्कालीन पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांच्या आदेशावरून पूल बांधण्यात आला, परंतु हा पूल काही दिवसांतच वाहून गेला, त्यामुळे आदित्य ठाकरे चांगेलच चर्चेत आले आहेत.
महिलांना पुन्हा पुराच्या पाण्यातून जाण्याची आली वेळ
या ठिकाणी महिला पिण्याचे पाणी भरण्यासाठी जीव धोक्यात घालून पुराच्या पाण्यातून वाट काढत जात आहेत, असे फोटो आणि व्हिडीओ व्हायरल झाल्यावर याची शिवसेना नेते आदित्य ठाकरे यांनी गंभीर दखल घेतली. शिवसैनिकांच्या मदतीने तिथे लोखंडी पूल बांधला. त्र्यंबकेश्वर तालुक्यातील ठाणापाड्याच्या दुर्गम भागात असलेल्या खरशेत ग्रामपंचायतीअंतर्गत शेंद्रीपाडा येथे हा प्रकार घडला. त्यानंतर घटनास्थळाला स्वत: आदित्य ठाकरे यांनी भेट दिली होती. त्र्यंबकेश्वर तालुक्यात मागच्या तीन आठवड्यांत मुसळधार पाऊस होत आहे. नद्या, नाले, ओहोळ यांना पूर आला. याच पुराच्या पाण्यात हा लोखंडी पूल वाहून गेला आहे. त्यामुळे येथील महिलांना पुन्हा एकदा लाकडी बल्ल्यांवरून पाण्याचे हंडे घेऊन जाण्याची जीवघेणी कसरत करावी लागत असल्याची छायाचित्रे-चित्रफिती समाजमाध्यमांमध्ये फिरत आहेत.