बेस्ट बसमधून उतरा, लगेच दुचाकी चालवा
मुंबई : मुंबईच्या धकाधकीच्या जीवनात बेस्ट बस हे प्रवासाचे बेस्ट साधन आहे. पण रस्त्यापासून आत असलेल्या ठिकाणी जायचे कसे, असा प्रश्न भडसावत असेल तर त्यावरही बेस्टने नामी उपाय शोधला आहे. बेस्ट प्रशासनाने दुचाकी सेवेत आणल्या असून त्या तुम्ही तुमच्या इच्छित ठिकाणापर्यंत नेऊ शकता. प्रत्येत थांब्यावर या दुचाकी उभ्या असतील.
बसमधून उतरणाऱ्या प्रवाशांना इच्छितस्थळी जाण्यासाठी तात्काळ एक पर्यायी वाहतूक सुविधा उपलब्ध व्हावी यासाठी बेस्ट उपक्रमाने जून २०२२ पासून मुंबईतील निवडक थांब्यांवर विजेवर धावणारी दुचाकी सेवा सुरू केली. सध्या ७०० दुचाकी सेवेत असून लवकरच आणखी एक हजार दुचाकीची त्यात भर पडणार आहे. दोन महिन्यात टप्प्याटप्याने या दुचाकींची संख्या वाढविण्यात येईल, अशी माहिती बेस्ट उपक्रमातील अधिकाऱ्यांनी दिली. प्रथम अंधेरीत या सेवेची चाचणी करण्यात आली होती.
बेस्टची प्रवासी संख्या वाढावी आणि उत्पन्नात भर पडावी यासाठी बेस्ट उपक्रमाने प्रायोगिक तत्वावर निवडक बस थांब्यांवर विजेवर धावणाऱ्या दुचाकी उपलब्ध करण्याचा निर्णय घेतला होता. अंधेरीधील ४० ठिकाणी प्रयोगिक तत्वावर दुचाकी सेवा सुरू करण्यात आली होती. त्याला चांगला प्रतिसाद मिळाल्यानंतर आता दुचाकी सेवांचा विस्तार करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यानुसार अंधेरी, विलेपार्ले, खार, सांताक्रूझ, जुहू, वांद्रे, माहीम, दादर या भागात ही सेवा उपलब्ध करण्यात आली. मुंबईतील प्रमुख बसथांबे, व्यावसायिक क्षेत्रे, निवासी क्षेत्रे इत्यादींना ही सेवा जोडण्याचा बेस्ट उपक्रमाचा प्रयत्न आहे.
या दुचाकीचा वेग प्रतितास २५ किलोमीटर इतका आहे. प्रति तीन किलोमीटर प्रवास आणि मूळ भाडे २० रुपये आणि त्यानंतर दीड रुपये प्रति मिनीट शुल्क आकारण्यात येत आहे. प्रवाशांना ‘वोगो’ ॲपवर नोंदणी करून या दुचाकी सेवेचा लाभ घेता येतो. विजेवर धावणाऱ्या दुचाकीना चांगला प्रतिसाद मिळत असून येत्या दोन महिन्यांत आणखी एक हजार दुचाकी सेवेत दाखल होत आहेत. मुंबईत या सेवेचा विस्तार करण्यात येणार आहे. या दुचाकी बेस्ट थांब्याच्या बाजूलाच उभ्या करण्यात येत असून बसमधून उतरताच इच्छित स्थळी जाण्यासाठी त्या तात्काळ उपलब्ध होणार आहेत.