हृदयविकाराच्या झटक्याने शुक्रवारी संध्याकाळी त्यांनी अखेरचा श्वास घेतला

मुंबई: हिंदी चित्रपटसृष्टीतून अत्यंत दु:खद बातमी समोर आली आहे. ज्येष्ठ अभिनेत्री तबस्सुम गोविल यांचे निधन झाले. त्या ७८ वर्षांच्या होत्या. मिळालेल्या माहितीनुसार शुक्रवारी संध्याकाळी हृदयविकाराच्या झटक्याने त्यांचे निधन झाले. ‘फूल खिले हैं गुलशन गुलशन’ या शोमधून तबस्सुम विशेष लोकप्रिय झाल्या होत्या. दरम्यान २१ नोव्हेंबर रोजी मुंबईतील सांताक्रूझ याठिकाणी त्यांच्यासाठी प्रार्थना सभेचे आयोजन करण्यात आले आहे.
त्यांचा मुलगा होशांग गोविल यांनी त्यांच्या आईच्या निधनाचे वृत्त दिले. पीटीआयशी बोलताना होशांग यांनी अशी प्रतिक्रिया दिली की, ‘काही दिवसांपूर्वी त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यांना गॅस्ट्रोची समस्या होती आणि आम्ही तपासणीसाठी गेलो होतो. त्यांना रात्री ८.४० आणि ८.४२ वाजता असा दोन वेळा हृदयविकाराचा झटका आला. शुक्रवारी रात्री त्यांनी शांततेत अखेरचा श्वास घेतला.’ होशांग यांनी दिलेल्या वृत्तानुसार गॅस्ट्रोची समस्येमुळे त्यांना रुग्णालयात भरती केल्यानंतर त्यांना डिस्चार्ज देण्यात आला होता. पण शुक्रवारी त्यांना पुन्हा एकदा रुग्णालयात दाखल केले.
‘रामायण’ मालिकेत रामाची भूमिका साकारणाऱ्या अरुण गोविल यांच्या वहिनी आहेत तबस्सुम
तबस्सुम या प्रसिद्ध टीव्ही मालिका ‘रामायण’मध्ये रामाची भूमिका साकारणाऱ्या अरुण गोविल यांच्या वहिनी आणि आणि विजय गोविल यांच्या पत्नी आहेत. तबस्सुम यांनी टॉक शोच्या होस्ट म्हणून विशेष लोकप्रियता मिळवली. त्या एक युट्यूबरही आहेत. दरम्यान तबस्सुम यांनी आपल्या करिअरची सुरुवात बाल कलाकार म्हणून केली होती. त्यावेळी त्यांना प्रेमाने बेबी तबस्सुम म्हटले जायचे.

बालकलाकार म्हणून करिअरची सुरुवात
तबस्सुम यांनी बालकलाकार म्हणून ‘नर्गिस’मधून करिअरला सुरुवात केली. यानंतर त्या ‘मेरा सुहाग’, ‘बैजू बावरा’, ‘सरगम’, ‘हीर रांझा’, ‘नाचे मयुरी’ यांसारख्या अनेक चित्रपटांमध्ये दिसल्या.
वडिलांनी दिले तबस्सुम हे नाव
तबस्सुम यांचा जन्म १९४४ साली स्वातंत्र्यासाठी लढा देणारे स्वातंत्र्यसैनिक अयोध्यानाथ सचदेव यांच्या घरी मुंबईत झाला. त्यांची आई असगरी बेगम याही स्वातंत्र्यसैनिक, पत्रकार आणि लेखिका होत्या. तबस्सुम यांच्या आईच्या धार्मिक भावना लक्षात घेऊन त्यांच्या वडिलांनी हे तबस्सुम नाव ठेवले. मात्र त्यांच्या आईने प्रेमाने त्यांचे टोपणनाव किरण बाला ठेवले होते.