मुंबई : सामनावीर नितीन सोळंकीची (१० धावांत ४ बळी) प्रभावी गोलंदाजी आणि सलामीवीर श्रीकांत दुधवडकरची (नाबाद २१ धावा) दमदार फलंदाजी यामुळे जसलोक हॉस्पिटलने बलाढ्य कस्तुरबा हॉस्पिटल संघावर ९ विकेटने साखळी ड गटात पहिला विजय नोंदविला. डॉ. परमेश्वर मुंडेने कस्तुरबा हॉस्पिटलची फलंदाजी सावरण्यासाठी शर्थीचे प्रयत्न केले. सामन्यातील उत्कृष्ट क्रिकेटपटूचा पुरस्कार नितीन सोळंकी व डॉ. परमेश्वर मुंडे यांना क्रिकेटपटू चंद्रकांत करंगुटकर, प्रदीप क्षीरसागर व शिवछत्रपती पुरस्कार विजेते लीलाधर चव्हाण यांच्या उपस्थितीत देण्यात आला.
नवरोज-आझाद मैदानावर नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय कस्तुरबा हॉस्पिटल संघाला लाभदायक ठरला नाही. जसलोक हॉस्पिटलचे प्रमुख गोलंदाज नितीन सोळंकी (१० धावांत ४ बळी), प्रवीण मोरजकर (३ धावांत ३ बळी), दीपक रत्नापुरकर (८ धावांत १ बळी) व प्रसाद पाटील (१२ धावांत १ बळी) यांनी झटपट विकेट घेतल्यामुळे कस्तुरबा हॉस्पिटलचा डाव अकराव्या षटकाला पत्त्याच्या बंगल्याप्रमाणे अवघ्या ३५ धावसंख्येवर कोसळला. कस्तुरबा हॉस्पिटलच्या डॉ. परमेश्वर मुंडेने ३ चौकारांच्या सहाय्याने ८ चेंडूत १३ धावा फटकाविल्या. सलामीवीर श्रीकांत दुधवडकरच्या (१४ चेंडूत नाबाद २१ धावा, १ षटकार व ३ चौकार) झंझावाती फलंदाजीमुळे जसलोक हॉस्पिटलने विजयी लक्ष्य ५.३ षटकात १ बाद ३९ धावा फटकावून साध्य केले. सत्कारमूर्ती अंकुश जाधवने एकमात्र बळी घेतला.