मुंबई :सचिन ठाकूर (४४ धावा) व दीपक काळे (३ बळी) यांच्या उत्कृष्ट खेळामुळे रहेजा हॉस्पिटलने सायन हॉस्पिटल संघावर ४ विकेटने विजय मिळवून ओम्नी ट्रॉफी आंतर हॉस्पिटल टी-२० क्रिकेट स्पर्धेमधील साखळी अ गटात दोन गुणांची नोंद केली. आयडियल स्पोर्ट्स अकॅडमी-ग्रुप आणि ओम्नी ग्लोबल स्पोर्ट्स मॅनेजमेंटतर्फे नवरोज-आझाद मैदान येथे सुरु असलेल्या स्पर्धेत संभाजी थोरातने आक्रमक अर्धशतक झळकवूनसुध्दा सायन हॉस्पिटल संघाला पराभव टाळता आला नाही.
संभाजी थोरात (४० चेंडूत ५२ धावा, ६ चौकार) व सुबोध म्हात्रे (३१ चेंडूत ३४ धावा, ४ चौकार) यांच्या दमदार फलंदाजीमुळे सायन हॉस्पिटलने मर्यादित २० षटकात ७ बाद १३७ धावा फटकाविल्या. रहेजा हॉस्पिटलचे दीपक काळे (२९ धावांत ३ बळी) व चेतन सुर्वे (१७ धावांत २ बळी) यांनी प्रतिस्पर्ध्यांची धावसंख्या नियंत्रित राखणारी गोलंदाजी केली. सचिन ठाकूर (३६ चेंडूत ४४ धावा, ५ चौकार) व विजय वैती (२१ चेंडूत २८ धावा, ४ चौकार) यांनी विजयी लक्ष्य गाठणारी फलंदाजी केली. परिणामी रहेजा हॉस्पिटलने सायन हॉस्पिटल संघावर १९ व्या षटका अखेर ६ बाद १३८ धावसंख्या रचून मात केली. सामन्यातील उत्कृष्ट खेळाडूचा पुरस्कार सचिन ठाकूर व संभाजी थोरात यांना देऊन गौरविण्यात आले.