नवी दिल्ली/ मुंबई: पंतप्रधान नरेंद्र मोदी मंगळवारी, ८ नोव्हेंबर २०२२ रोजी संध्याकाळी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे जी२० अध्यक्षांचा लोगो, थीम आणि संकेतस्थळाचे अनावरण करणार आहेत. परराष्ट्र मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, जी२० अध्यक्षपद भारताला आंतरराष्ट्रीय महत्त्वाच्या तातडीच्या मुद्द्यांवर जागतिक कार्यक्रमात योगदान देण्याची संधी देईल. १ डिसेंबर २०२२ पासून भारत जी२०चे अध्यक्षपद स्वीकारणार आहे. आमच्या जी२० अध्यक्षाचा लोगो, थीम आणि संकेतस्थळ भारताचे संदेश आणि जगाला व्यापक प्राधान्यक्रम दर्शवेल, असे सांगण्यात आले.
१ डिसेंबरपासून भारत इंडोनेशियाकडून जी२० चे अध्यक्षपद स्वीकारणार आहे. जी२० किंवा २० देशांचा समूह हा जगातील प्रमुख विकसित आणि विकसनशील अर्थव्यवस्थांचा आंतरराष्ट्रीय मंच आहे. यामध्ये अर्जेंटिना, ऑस्ट्रेलिया, ब्राझील, कॅनडा, चीन, फ्रान्स, जर्मनी, भारत, इंडोनेशिया, इटली, जपान, कोरिया, मेक्सिको, रशिया, सौदी अरेबिया, दक्षिण आफ्रिका, तुर्की, ब्रिटन, अमेरिका आणि युरोपियन संघातील देशांचा समावेश आहे.
जी२० हा आंतरराष्ट्रीय आर्थिक सहकार्याचा प्रमुख मंच आहे, जो जागतिक सकल देशांतर्गत उत्पादनाच्या (जीडीपी) अंदाजे ८५ टक्के, जागतिक व्यापाराच्या ७५ टक्क्यांहून अधिक आणि जगाच्या लोकसंख्येच्या जवळपास दोन तृतीयांश लोकांचे प्रतिनिधित्व करते. जी२० अध्यक्षपदाच्या काळात भारतभर विविध ठिकाणी २०० बैठका होणार आहेत. या सर्व बैठका ३२ विविध क्षेत्रांशी संबंधित महत्त्वाच्या मुद्द्यांवर आधारित असतील.