आयडियल स्पोर्ट्स अकॅडमी, ओम्नी ग्लोबल स्पोर्ट्स मॅनेजमेंट आणि आयडियल ग्रुपतर्फे १ नोव्हेंबरपासून सुरु होणाऱ्या आंतर हॉस्पिटल टी-२० क्रिकेट स्पर्धेत रुग्णालयीन १२ संघ झुंजणार आहेत. कोकिलाबेन धीरूभाई अंबानी हॉस्पिटल-अंधेरी विरुद्ध सायन हॉस्पिटल यामधील उद्घाटनीय लढत नवरोज क्लबच्या सेक्रेटरी राधिका राउळ, आयडियल स्पोर्ट्स अकॅडमीचे कार्याध्यक्ष गोविंदराव मोहिते, क्रिकेटपटू चंद्रकांत करंगुटकर व ब्रीच कॅन्डी हॉस्पिटल क्रिकेट संघाचे कप्तान प्रदीप क्षीरसागर यांच्या प्रमुख उपस्थितीत आझाद मैदानावर सुरु होईल.
स्पर्धेमध्ये नानावटी हॉस्पिटल, लीलावती हॉस्पिटल, ब्रीच कॅन्डी हॉस्पिटल, केडीए हॉस्पिटल-अंधेरी, सायन हॉस्पिटल, रहेजा हॉस्पिटल, हिरानंदानी हॉस्पिटल, सेव्हन हिल्स हॉस्पिटल, केडीए हॉस्पिटल-नवी मुंबई, जसलोक हॉस्पिटल, जेजे हॉस्पिटल, कस्तुरबा हॉस्पिटल आदी संघ विजेतेपदासाठी २८ नोव्हेंबरपर्यंत लढती देणार आहेत. खेळाडूंच्या शिफारशीनुसार रुग्णालयीन एकूण २५ क्रिकेटपटूना भारतीय डाक ऑफिसच्या एक वर्षीय दहा लाख अपघाती विमा-प्रिमियम भरून उपलब्ध करण्यासाठी ओम्नी ग्लोबल स्पोर्ट्स मॅनेजमेंटचे संचालक ओमकार मालडीकर प्रयत्नशील आहेत. रुग्णालयीन क्रिकेट स्पर्धा गाजविणारे अष्टपैलू क्रिकेटपटू लीलावती हॉस्पिटलचे धर्मेश स्वामी व कस्तुरबा हॉस्पिटलचे अंकुश जाधव तसेच डॉ. स्वप्नील निसाळ यांचा स्पर्धेवेळी गौरव करण्यात येणार असल्याची माहिती शिवछत्रपती पुरस्कार विजेते लीलाधर चव्हाण यांनी दिली. विजेत्या-उपविजेत्यांना ट्रॉफीसह सर्व खेळाडूंना ओम्नी टी शर्ट दिले जाणार आहेत.