पर्थ : भारताचा दक्षिण आफ्रिकेकडून पराभव झाला. पण त्याचा मोठा धक्का पाकिस्तानला बसला आहे. पाकिस्तानने आज एक सामना जिंकला खरा, पण भारताच्या पराभवानंतर त्यांचा गेम झाल्याचे समोर येत आहे. हा सामना फक्त भारत आणि दक्षिण आफ्रेकेसाठीच महत्वाचा नव्हता, तर पाकिस्तानचेही लक्ष या सामन्यावर होते. कारण हा एक सामना तीन संघांचे भवितव्य ठरवणारा होता. या सामन्यात भारताला पराभव पत्करावा लागला आणि त्यांना अव्वल स्थान गमवावे लागले. त्यामुळे आता गुणतालिकेत अव्वल स्थानी दक्षिण आफ्रिकेचा संघ पोहोचला आहे आणि त्यांचे आता पाच गुण झाले आहेत. त्यामुळे जर त्यांनी आता फक्त एक सामना जरी जिंकला तरी त्यांचे सात गुण होतील. पण पाकिस्तानच्या संघाला मात्र आता सात गुण कमावता येणार नाहीत. कारण त्यांचे दोन सामने शिल्लक आहेत आणि त्यांच्या खात्यात दोन गुण आहेत. त्यामुळे जर पाकिस्तानने आता दोन्ही सामने जिंकले तर त्यांचे सहा गुण होतील, पण त्यांचे सात गुण होऊ शकत नाही. त्यामुळे भारताच्या पराभवामुळे पाकिस्तानचा गेम झाला, अशी भावना क्रिकेट चाहत्यांमध्ये आहे.
लुंगी एनगिडीच्या गोलंदाजीवर भारतीय फलंदाजांची त्रेधा उडाली होती. लुंगीने चार विेकेट्स घेत भारताचे कंबरडे मोडले होते. पण भारतीय फलंदाजांच्या लुंगी डान्सनंतर सूर्यकुमार यादव चांगलाच तळपला आणि त्यामुळेच भारताला यावेळी आव्हानात्मक धावसंख्या उभारता आली. सूर्याने यावेळी ३० चेंडूंत आपले अर्धशतक साकारले. त्यानंतरही सूर्याने धडाकेबाज फटकेबाजी केली. सूर्याने या सामन्यात फक्त ४० चेंडूंत सहा चौकार आणि तीन षटकारांच्या जोरावर ६८ धावा केल्या. भारताचा सूर्या हा असा एकच फलंदाज ठरला की ज्याला मोठी खेळी साकारता आली. त्यामुळे भारताला दक्षिण आफ्रिकेपुढे १३४ धावांचे सन्मानजनक आव्हान ठेवता आले. त्यानंतर भारताच्या गोलंदाजांनी दक्षिण आफ्रिकेच्या फलंदाजांना चांंगलेच जखडून ठेवले होते. कारण ९ षटकांमध्ये भारताने त्यांची ३ बाद ३५ अशी अवस्था केली होती. पण त्यानंतर हळूहळू भारताची या सामन्यावरील पकड ढिली व्हायला लागली. कारण भारताचे वेगवान गोलंदाज थांबवले गेले आणि अश्विनला गोलंदाजीला आणले.