अहमदाबाद : गुजरातमध्ये एक भयानक दुर्घटना घडली आहे. 500 जण नदीत पडले आहे. गुजरातच्या मोरबी यथे ही मोठी दुर्घटना घडली आहे. मोरबीतील मच्छू नदीवर असणारा केबल ब्रिज अचानक कोसळला आहे. त्यामुळे मोठी हानी झाली आहे. या दुर्घटनेत जवळपास 500 जणांचा जीव धोक्यात असल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे. दुर्घटना घडताच बचाव दल घटनास्थळी दाखल झालं असून बचाव कार्य सुरू आहे. जखमींना रुग्णालयात घेऊन जाण्यासाठी रुग्णवाहिकाही तैनात करण्यात आल्या आहेत.
गुजरातचे गृहमंत्री हर्ष संघवी यांनी दिलेल्या माहितीनुसार, बचाव दलाने आतापर्यंत सुमारे ७० हून अधिक लोकांना पाण्यातून बाहेर काढलं आहे. संबंधित जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आलं असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. तर काहींची प्राथमिक तपासणी करून त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. विशेष म्हणजे पाच दिवसांपूर्वी या पुलाची डागडुजी करण्यात आली होती. यानंतर रविवारी सायंकाळी ही मोठी दुर्घटना घडली आहे.
या पुलावर 500 जण असल्याची माहिती समोर आली होती. देशभरात सध्या छटपुजेचा उत्साह आहे. छटपुजेनिमित्त मोठ्या संख्येने लोक या ब्रिजवर उपस्थित होते. या उत्साहादरम्यान घडलेल्या या घटनेमुळे आनंदावर विरझन पडलं आहे.
पूल कोसळल्याची माहिती मिळताच पोलीस, बचाव पथक, अग्निशमन दलाचे कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले आहेत. या घटनेमुळे परिसरात मोठी खळबळ उडाली आहे.
सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, पुलावर 500 जण होते. पण पूल कोसळल्यानंतर नेमके किती जण नदीत वाहून गेले याची माहिती अद्याप समजू शकलेली नाही.
या घटनेमुळे मोठी जीवीतहानी झाल्याची भीती वर्तवली जात आहे. नदीत वाहून गेलेल्या नागरिकांना वाचवण्याचे शर्थीने प्रयत्न सुरु आहेत. बचाव पथक घटनास्थळी दाखल झालं आहे. नदीत अडकलेल्यांना वाचवण्यासाठी रेस्क्यू ऑपरेशन सुरु करण्यात आली आहे.
या घटनेनंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्वीट करून तातडीची मदत करण्याच्या सूचना दिल्या आहेत. तर गुजरातचे मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल यांनी ट्वीट करत शोक व्यक्त केला आहे. तसेच मृतांच्या कुटुंबीयांना ४ लाख रुपये तर जखमींना ५० हजार रुपयांची मदत करण्याची घोषणा गुजरात सरकारने केली आहे.