मुंबई : आयडियल स्पोर्ट्स अकॅडमी, ओम्नी ग्लोबल स्पोर्ट्स मॅनेजमेंट आणि आयडियल ग्रुपतर्फे १ नोव्हेंबरपासून होणाऱ्या आंतर हॉस्पिटल टी-२० क्रिकेट स्पर्धेत मुंबई-ठाणे जिल्ह्यातील नामवंत रुग्णालयीन १२ संघ सहभागी झाले आहेत. यानिमित्त झालेल्या रुग्णालयीन संघांच्या सभेत उदयोन्मुख रुग्णालयीन क्रिकेटपटूना मुंबईतील क्रिकेट तसेच इंग्लंडमधील कौंटी व अमेरिकन प्रीमियर लीग-२०२५ आदी क्रिकेट स्पर्धांमध्ये संधी उपलब्ध करून देण्यासाठी प्रयत्नशील असल्याची ग्वाही ओम्नी ग्लोबल स्पोर्ट्स मॅनेजमेंटचे डायरेक्टर ओमकार मालडीकर यांनी दिली.
आझाद मैदानावरील नवरोज खेळपट्टीवर २८ नोव्हेंबरपर्यंत रंगणाऱ्या ओम्नी ट्रॉफी आंतर हॉस्पिटल क्रिकेट स्पर्धेचे विजेतेपद पटकाविण्यासाठी लीलावती हॉस्पिटल, नानावटी हॉस्पिटल, केडीए हॉस्पिटल, जे.जे. हॉस्पिटल, ब्रीच कॅन्डी हॉस्पिटल, सायन हॉस्पिटल, रहेजा हॉस्पिटल, हिरानंदानी हॉस्पिटल, रिलायन्स हॉस्पिटल, जसलोक हॉस्पिटल, कस्तुरबा हॉस्पिटल, सेव्हन हिल्स हॉस्पिटल यांच्यामध्ये चुरस राहील. स्पर्धेनिमित्त रुग्णालयीन क्रिकेट स्पर्धा गाजविणारे अष्टपैलू क्रिकेटपटू लीलावती हॉस्पिटलचे धर्मेश स्वामी व कस्तुरबा हॉस्पिटलचे अंकुश जाधव तसेच डॉ. स्वप्नील निसाळ यांचा गौरव करण्यात येणार असल्याची माहिती आयडियल अकॅडमीचे कार्याध्यक्ष गोविंदराव मोहिते यांनी दिली. रुग्णालयीन क्रिकेटपटूंना प्रोत्साहन देण्यासाठी गतवर्षापासून सहकार्य करणारे क्रिकेटपटू ओमकार मालडीकर यांचा रुग्णालयीन क्रिकेट संघांच्यावतीने विशेष सत्कार शिवछत्रपती पुरस्कार विजेते लीलाधर चव्हाण, ब्रीच कॅन्डी हॉस्पिटल क्रिकेटचे कप्तान प्रदीप क्षीरसागर व माजी क्रिकेटपटू चंद्रकांत करंगुटकर यांच्या उपस्थितीत करण्यात आला. गेली दोन दशके खेळाडू तसेच संघटक म्हणून कार्यरत असलेले ओम्नी ग्लोबल स्पोर्ट्स मॅनेजमेंटचे डायरेक्टर ओमकार मालडीकर यांनी इंग्लंडमध्ये कौंटी क्रिकेट स्पर्धेत मिडलसेक्स संघातून प्रतिनिधित्व केले आहे. ओमकार मालडीकर यांनी क्रिकेटचा श्रीगणेशा शारदाश्रम शाळेतून गिरविला असून युवा क्रिकेट स्पर्धा, आयडियल आंतर हॉस्पिटल क्रिकेट स्पर्धा, आयडियल शालेय बुध्दिबळ व कॅरम स्पर्धा आदी उपक्रमात त्यांचे महत्वपूर्ण योगदान राहिले आहे.