~ ग्राहकांचे बदलते प्राधान्यक्रम, खर्च करण्याजोग्या उत्पन्नात वाढ, ऑनलाइन-ऑफलाइन खरेदीचे संघटित पर्याय आणि छोट्या अंतराने नवीन कार मॉडेल्स बाजारात येत राहणे या काही प्रमुख कारणांमुळे वाढीला चालना मिळत आहे ~
मुंबई: सप्टेंबर 13, 2022 — भारतातील यूज्ड-कार (वापरलेल्या कार) बाजारपेठेचे मूल्य FY22 मध्ये $23 अब्ज एवढे निश्चित करण्यात आले असून, FY27पर्यंत ही 19.5% CAGRवर वाढ होऊन या बाजारपेठेचे मूल्य दुप्पट होणे अपेक्षित आहे, असे इंडियन ब्ल्यू बुक (आयबीबी) कार अँड बाइक रिपोर्ट 2022 मध्ये नमूद करण्यात आले आहे. मुंबईतील महिंद्रा टॉवरमध्ये झालेल्या एका भव्य सोहळ्यात हा अहवाल प्रसिद्ध करण्यात आला. FY22 कार अँड बाइक प्री-ओन्ड कार उद्योगावरील अहवालाची 5वी आवृत्ती इंडियन ब्ल्यू बुक आणि दास वेल्ट ऑटो यांच्या सहयोगाने तयार करण्यात आली आहे.
भारतातील वापरलेल्या वाहनांच्या उद्योगाचे सध्या असंघटित रचनेकडून संघटित प्रणालीकडे स्थित्यंतर सुरू आहे. असंघिटत रचनेत व्यवहार बहुतांशी रस्त्याच्या कडेला गॅरेज चालवणारे मेकॅनिक्स, छोटे ब्रोकर्स आणि कारमालक यांच्यात व्हायचे, आता ते एका संघटित प्रणालीद्वारे होतात आणि बऱ्याच नवीन घटकांनी या बाजारपेठेत प्रवेश केला आहे. अहवालानुसार, यूज्ड-कार बाजारपेठेच्या पुढील पाच वर्षांतील वाढीत योगदान देणारा प्रमुख घटक वाढता मध्यमवर्ग व तरुण लोकसंख्या असेल; याशिवाय खर्च करण्यायोग्य उत्पन्नामध्ये वाढ; तंत्रज्ञानामुळे निर्माण झालेली पारदर्शकता, सोय, व्यवहारांतील सुलभता; प्रमाणित कार्सची उपलब्धता; उत्पन्न वाढल्यामुळे कार किंवा टू-व्हीलर बाळगण्याच्या सरासरी कालावधीत होत झालेली घट; छोट्या खंडानंतर नवीन मॉडेल्स बाजारात येणे; डीलर ट्रेड-इन बोनस व बायबॅकची हमी आदी कारणांमुळे वाढीला हातभार लागत आहे.
व्यक्तिगत वाहतूक साधनांच्या मागणी वाढ झाल्यामुळे उदयाला आलेले संघटित ऑनलाइन व फिजिटल यूज्ड कार प्लॅटफॉर्म्स तसेच सरकारकडून मिळणारे सहाय्य यांमुळेही वाढीला चालना मिळणे अपेक्षित आहे.
“आयबीबी अहवालाची ही आवृत्ती विशेष आहे. कोविड साथीनंतर व्यवसायाचे चित्र बदलत असताना, देशभरातील ग्राहकांची वापरलेल्या गाड्या खरेदी करण्यास स्पष्ट पसंती दिसत आहे. वापरलेल्या गाड्या खरेदी करणे ही एकेकाळी तडजोड समजली जात होती. मात्र, आता ग्राहक कार खरेदी करण्याचा विचार करतात, तेव्हा वापरलेल्या गाड्या सहजपणे विचारात घेतात. आमचा हा उद्योग पुढील काही वर्षांत दोन अंकी वाढीचा दर साध्य करेल यात काही शंकाच नाही,” असे महिंद्रा फर्स्ट चॉइसचे मुख्य कार्यकारी अधिकारी व व्यवस्थापकीय संचालक श्री. आशुतोष पांडेय म्हणाले.
इंडियन ब्ल्यू बुक अहवाल FY2021-2022मधील ठळक निरीक्षणे पुढीलप्रमाणे:
— वापरलेली गाडी ते नवीन गाडी हे गुणोत्तर ~1:4 आहे
— वापरलेल्या गाड्यांची सरासरी किंमत ~4.5 लाख रुपये आहे
— संघटित, असंघटित व सीटूसी यूज्ड कारचा वाटा अनुक्रमे 20%, 45% आणि 35% आहे
— वापरलेल्या गाडीचे सरासरी आयुर्मान ~ चार वर्षे आहे
— विभाजित मागणी पुरवठा बाजारपेठेची वैशिष्ट्ये – पुरवठा (महानगरांत: 65%, महानगरांबाहेर: 35%), मागणी (महानगरांत: 35%, महानगरांबाहेर: 65%)
“इंडिया ब्ल्यू बुक अहवालामध्ये यूज्ड-कार विभागाच्या उत्क्रांत होत असलेल्या अंगांचा सखोल अभ्यास करण्यात आला आहे. यामुळे आपल्याला ग्राहकांची मानसिकता, उद्योगातील प्रवाह व घडामोडी समजून घेण्यात मदत होईल. प्री-ओन्ड कार्सच्या बाजारपेठेला कोविड साथीपासून वेग आला आहे. ग्राहक वापरलेल्या गाड्या खरेदी करण्यास मोठ्या संख्येने प्राधान्य देऊ लागले आहेत आणि नवीन कार्स व वापरलेल्या कार्सच्या विक्रीतील तफावत लक्षणीयरित्या कमी होत आहे. या अहवालानुसार, संघटित यूज्ड कार बाजारपेठेचा वाटा FY22मध्ये 20% आहे, तो FY26पर्यंत 45% होणे अपेक्षित आहे. फोक्सवॅगन इंडियाचा प्री-ओन्ड कार व्यवसाय दास वेल्ट ऑटो या संघटित क्षेत्राच्या लक्षणीय वाढीतील सक्रिय योगदान देत आहे, याचा फोक्सवॅगनला अभिमान आहे. प्री-ओन्ड कार खरेदी करणाऱ्या ग्राहकांच्या अनुभवात सुधारणा करण्याच्या दृष्टीने नवीन मापदंड स्थापन करण्यासाठी आम्ही अविश्रांतपणे काम करत आहोत,” असे फोक्सवॅगन पॅसेंजर कार्स इंडियाचे ब्रॅण्ड संचालक श्री. आशीष गुप्ता म्हणाले.
भारतीय यूज्ड कार बाजारपेठेबद्दल अहवालात दिलेली महत्त्वाची माहिती
- FY27पर्यंत भारतातील यूज्ड-कार बाजारपेठ 8 दशलक्ष युनिट्सच्या विक्रीचा टप्पा गाठेल असे अपेक्षित आहे.
- भारतातील यूज्ड कार बाजारपेठ दुप्पट दराने म्हणजेच 5% CAGRवर वाढेल असा अंदाज आहे.
- वापरलेली गाडी ते नवीन गाडी हे गुणोत्तर FY27पर्यंत 9 होणार आहे.
- कोविड साथ, डिजिटलायझेशन, लोकसंख्येच्या रचनेत व महत्त्वाकांक्षांमध्ये वेगाने होणारे बदल, प्रथमच कार खरेदी करणाऱ्या ग्राहकांच्या संख्येतील बदल आणि वित्तपुरवठ्याच्या विविध पर्यायांची उपलब्धता यांमुळे वाढीला लक्षणीय चालना मिळत आहे.
- FY22 मध्ये भारतात 3.5 दशलक्षांहून अधिक यूज्ड कार्स विकल्या गेल्या असा अंदाज आहे, यामुळे मागील वर्षाचा विक्रम मोडीत निघाला. त्याचवेळी जगभरात 40 दशलक्षांहून अधिक कार्सची विक्री झाली होती.
- आघाडीच्या 40 शहरांत 2026सालापर्यंत 10% CAGRवर वाढ अपेक्षित आहे, तर छोट्या शहरांमध्ये हीच वाढ 30% CAGRवर राहील असे अपेक्षित आहे.
- सर्वेक्षणाच्या निकालांनुसार, महानगरांबाहेरील कार खरेदी करणारे (64 टक्के) आपली पहिली कार म्हणून वापरलेली गाडी खरेदी करण्याची शक्यता आहे, तर महानगरांमध्ये हे प्रमाण 55 टक्के राहण्याची शक्यता आहे. वापरलेल्या कार्सना असलेली 65 टक्के मागणी महानगरांव्यतिरिक्त अन्य शहरांतून आहे आणि या वाढीचा CAGR 30 टक्के म्हणजेच महानगरांतील वाढीच्या तिप्पट आहे.
- कारचे सरासरी आयुर्मान FY11 मध्ये सहा वर्षे होते, FY22पर्यंत त्यात 33 टक्क्यांनी घट होऊन ते चार वर्षांवर आले आहे.
- सर्वेक्षणानुसार, यूज्ड कार खरेदी करणाऱ्या ग्राहकांमध्ये 15 टक्के स्त्रिया आहेत आणि फिजिटल मार्गाने गाडी खरेदी करण्यास तयार आहेत. FY21च्या तुलनेत ही 75 टक्क्यांपर्यंत तीव्र वाढ आहे.
- FY22 मध्ये प्री-ओन्ड कार्सच्या पुरवठ्यापैकी 65% मुंबई, दिल्ली राजधानी परिसर, बेंगळुरू, चेन्नई व हैदराबाद अशा महानगरांमध्ये केंद्रित होता
- कार विक्रेते सरासरी 70,000 किलोमीटर अंतर कापल्यानंतर गाडी विकून टाकण्याचा पर्याय स्वीकारतात, यामुळे FY22मध्ये वाहनाचे सरासरी वय चार वर्षे होते, FY21मध्ये ते 4.4 वर्षे होते.