गेल्या काही काळात महाराष्ट्रातील राजकारणात कटुता प्रचंड वाढली आहे. प्रतिस्पर्धी पक्षांमधील नेत्यांमध्ये द्वेषभाव वाढला आहे. मात्र, पुण्यातील गणपती विसर्जन सोहळ्यातील एक दृश्य या सगळ्याला छेद देणारे ठरले. चंद्रकांतदादांनी आदित्य यांना गणपतीचे दर्शन घेऊन येण्यास सांगितले. त्यानंतर आदित्य ठाकरे दर्शन घेऊन आले तेव्हा पालखी मार्गस्थ होण्याच्या मार्गावर होती.
मुंबई: एखाद्या कार्यक्रमात, समारंभात, व्यासपीठांवर किंवा सणांमध्ये राजकीय मतभेद सारून नेत्यांनी एकत्र येण्याची परंपरा महाराष्ट्राला नवी नाही. अलीकडच्या काळात महाराष्ट्राच्या राजकारणातील द्वेष वाढला असला तरी काही घटना राज्याची ही परंपरा आजही कायम असल्याचे दाखवून देतात. पुण्यातील गणपती विसर्जन सोहळ्यात शुक्रवारी पुन्हा एकवार त्याचा प्रत्यय आला. गेल्या काही काळात शिवसेना आणि भाजप यांच्यातील संघर्ष शिगेला पोहोचला आहे. त्यामुळे दोन्ही पक्षांतील नेत्यांमध्ये साहजिक प्रचंड वितुष्ट निर्माण झाले आहे. परंतु, कसबा गणपतीच्या विसर्जन मिरवणुकीवेळी भाजपचे माजी प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील आणि युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे हे राजकीय वैरभाव बाजुला सारून एकत्र येताना दिसले.
पुण्यातील मानाचा पहिला कसबा गणपतीची विसर्जन मिरवणूक शुक्रवारी सकाळी निघाली. त्याठिकाणी चंद्रकांत पाटील उपस्थित होते. तेव्हाच आदित्य ठाकरेही याठिकाणी पोहोचले. हे दोन्ही नेते समोरासमोर आल्यावर काय होणार, याची उत्सुकता सर्वांना लागली होती. तेव्हा चंद्रकांत पाटील यांनी आदित्य ठाकरे यांना पाहून त्यांच्याशी दिलखुलासपणे संवाद साधला. चंद्रकांतदादांनी आदित्य यांना गणपतीचे दर्शन घेऊन येण्यास सांगितले. त्यानंतर आदित्य ठाकरे दर्शन घेऊन आले तेव्हा पालखी मार्गस्थ होण्याच्या मार्गावर होती. चंद्रकांत पाटील आणि इतर जण आदित्य ठाकरेंची वाट पाहत थांबले होते. आदित्य ठाकरे येताच विसर्जनाला सुरुवात झाली. त्यावेळी चंद्रकांत पाटील आणि आदित्य ठाकरे यांनी एकत्रच कसबा गणपतीची पालखी खांद्यावर घेतली. महाराष्ट्राच्या सुसंस्कृत राजकारणाच्यादृष्टीने हे चित्र नक्कीच सुखावणारे होते.
आदित्य ठाकरेंभोवती तरुणींचा गराडा
युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांनी शुक्रवारी दगडुशेठ हलवाई, कसबा गणपती आणि पुण्यातील इतर गणेश मंडळांना भेट दिली. आदित्य ठाकरे गणपती विसर्जनासाठी पुण्यामध्ये दाखल झाले. त्यावेळी तरुणींचा गराडा त्यांच्याभोवती पडला होता. अनेकजण आदित्य ठाकरे यांच्यासोबत फोटो घेण्यासाठी प्रयत्न करत होते. जमलेल्या तरुणी ‘आदित्य आदित्य’ म्हणत जल्लोष करत होत्या.