सध्या मुंबईत भाजपाकडून ठिकठिकाणी ‘हिंदुंचं सरकार’ अशी बॅनरबाजी करण्यात आली आहे. त्यावरून भाजपा, शिंदे गट आणि ठाकरे गटात शाब्दिक युद्ध सुरू आहे. भाजपाने ठाकरे सरकारच्या काळात मंदिरं बंद असल्याचा मुद्दा उपस्थित करत वारंवार शिवसेना पक्षप्रमुख आणि तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंवर टीका केलीय. याला शिवसेना नेत्या मनिषा कायंदे यांनी प्रत्युत्तर दिलंय. “करोना काळात मोदींच्या आदेशानेच मंदिरं बंद केली, मग ते मुघलांचं सरकार होतं का?” असा सवाल मनिषा कायंदेंनी विचारला. त्या सोमवारी (५ सप्टेंबर) एबीपी माझाशी बोलत होत्या.
मनिषा कायंदे म्हणाल्या, “सर्व देशात केंद्र सरकारने निर्बंध लावले. भाजपाचे मुख्यमंत्री असलेल्या मध्य प्रदेश, गुजरात आणि इतर अनेक राज्यांमध्येही हेच निर्बंध होते. तेथे सर्व सार्वजनिक सणवार सुरू होते का? महाराष्ट्रात आम्ही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याच आदेशाचं पालन करत होतो. त्यांनीच सर्व सणांवर निर्बंध आणले, मग ते हिंदूंचं सरकार नव्हतं का? ते हिंदुत्ववादी सरकार नव्हतं का?”
“मोदींच्या आदेशाने केवळ महाराष्ट्रातीलच नाही, तर देशभरातील मंदिरं बंद केली होती. मग आता हा खोडसाळपणा, थिल्लरपणा का? हे म्हणतात हिंदूंचं सरकार आलं आहे, मग नरेंद्र मोदींनी देवळं बंद केली, ते काय मुघलांचं सरकार होतं का? ते काहीही बोलत आहेत. हा अत्यंत बालिशपणा आहे,” असं मत मनिषा कायंदे यांनी व्यक्त केलं.
“भाजपा नेते मोदी-शाहांना राजकारणातून हद्दपार करा म्हणणाऱ्या राज ठाकरेंच्या घरी”
भाजपा नेत्यांकडून वारंवार राज ठाकरेंच्या भेटीगाठी होत आहेत. यावर बोलताना त्या म्हणाल्या, “राज ठाकरेंची भूमिका सतत बदलत आली आहे. २०१४ आणि २०१९ चीच तुलना केली तर यांच्या भूमिका परस्पर विरोधी होत्या. कधी ते मोदींचं गुणगाण गायचे, तर कधी मोदी-शाहांना देशाच्या राजकारणातून हद्दपार करा असं म्हटलंय. असं असताना भाजपाचा प्रत्येक नेता राज ठाकरेंच्या घरी का जात आहे? मुंबई महानगरपालिकेत सत्ता आणायची ही भाजपाची एकच इर्षा उरली आहे. त्याप्रमाणे ते वागत आहेत.”
“एकच आमदार असणाऱ्या पक्षाच्या प्रमुखांकडे भाजपा वारंवार का जात आहे?”
“ज्या पक्षाकडे एकच आमदार अशा पक्षप्रमुखांकडे हे वारंवार जात आहेत. याचं कारण काय? म्हणजे यांना शेवटी कुठले तरी ठाकरे पाहिजेच. ठाकरेंशिवाय ते कोणतीही निवडणूक जिंकू शकत नाही हे स्पष्ट झालं आहे. भाजपा स्वबळावर महाराष्ट्रात कधीही सरकार स्थापन करू शकली नाही. ही त्यांची खरी पोटदुखी आहे,” अशी टीका कायंदे यांनी केली.