कोरोना संकटाच्या दोन वर्षानंतर यंदा गणेशोत्सव धूमधडक्यात सर्वत्र साजरा होत आहे. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी देखील काल मुंबईमध्ये सहकुटुंब गणरायाची स्थापना केली. दरम्यान, आज शिवसेनेचे मुखपत्र ‘सामना’मधून भाजपवर जोरदार टीकास्त्र सोडण्यात आले आहे. “हे सर्व राज्य सरकारने गणेशोत्सव ‘बंधमुक्त केल्याने घडत आहे, अशी टिमकी काही मंडळी वाजवत असली तरी त्यात भक्तिभावापेक्षा राजकीय भावच जास्त आहे, हे राज्यातील गणेशभक्तही ओळखून आहेत,” अशा शब्दात शिवसेनेने शिंदे-फडणवीस सरकारला टोला लगावला आहे.
शिवसेनेने म्हटले आहे की, “आता कोरोनाचे संकट पूर्णपणे संपलेले नसले तरी लसीकरणामुळे त्याचे मळभ कमी झाले आहे. त्यामुळे साहजिकच गणेशोत्सवाचा उत्साह वाढला व गणरायाच्या आगमनाच्या जल्लोषी मिरवणुकांतही त्याचे प्रतिबिंब उमटले. गणरायाच्या आगमनासोबतच गौरीच्या स्वागताचीही जय्यत तयारी सर्वत्र झाली आहे. बाजारपेठा फुलल्या आहेत. पुढील दहा दिवस महाराष्ट्रात चांद्यापासून बांद्यापर्यंत हाच उत्साह आणि चैतन्य दिसणार आहे. वातावरण श्रद्धेने भारलेले असणार आहे.”
देशातील लोकशाही, उच्च संसदीय परंपरा, स्वातंत्र्य, घटनात्मक अधिकार, संविधानाची चौकट, धार्मिक एकोपा, राजकीय विरोधक अशा सगळ्यांचेच श्वास’ सरकारी दडपशाहीमुळे कोंडले गेले आहेत. तिकडे देशातील सामान्य माणूस तरी ‘मोकळा’ कुठे आहे?, असा सवालही यावेळी शिवसेनेने केला आहे.
तूच विघ्नहर्ता आहेस
‘गणराया, तू सुखकर्ता आणि विघ्नहर्ता आहेस. लोकशाही आणि घटनेने बहाल केलेले ‘मुक्त आणि निर्भय वातावरण’ निरंकुश सत्तालालसेच्या तावडीत सापडल्याने गुदमरले आहे. गणराया, देश ‘निर्भय’ कर, एवढीच प्रार्थना आज देशातील जनता तुला करीत आहे. तिचा स्वीकार कर,’ असा टोमणा विरोधकांना शिवसेनेने लगावला आहे.
माणूस मोकळा करी कुठे?
पुढे शिवसेनेने म्हटले आहे की, पुन्हा राज्यातील आणि देशातील सत्ताधारी हिंदू सण ‘मोकळे केल्याचे ढोल बडवले जात असले तरी प्रत्यक्षात देशातील वातावरण खरोखरच ‘मोकळे’ राहिले आहे काय? विरोधी पक्ष, नेते, सरकारचे टीकाकार यांची सत्ताधिकार आणि तपास यंत्रणांच्या माध्यमातून मुस्कटदाबी केली जात आहे. राज्या-राज्यांतील बिगर भाजप सरकारे शक्य होईल त्या मार्गाने बरखास्त केली जात आहेत.
सरकारी दडपशाहीमुळे कोंडले
पुढे लेखात म्हटले आहे की, प्रादेशिक पक्षांचे तर नामोनिशाण संपवून टाकण्याची भाषा केंद्रातील सत्ताधारी पक्षाचे अध्यक्ष करीत आहेत. देशातील लोकशाही, उच्च संसदीय परंपरा, स्वातंत्र्य, घटनात्मक अधिकार, संविधानाची चौकट, धार्मिक एकोपा, राजकीय विरोधक अशा सगळ्यांचेच‘श्वास’ सरकारी दडपशाहीमुळे कोंडले गेले आहेत. तिकडे देशातील सामान्य माणूस तरी ‘मोकळा’ कुठे आहे? बेरोजगारी आणि सतत व वाढणारी महागाई या कोंडीत त्याचाही श्वास गुदमरलेलाच आहे. नवीन रोजगार राहिला बाजूला, आहे तो रोजगारदेखील हातून जात असल्याने ‘कमाई आणि महागाई’ यांचा ताळमेळ लावता लावता त्याची घालमेल होत आहे.
प्रार्थनेचा स्वीकार कर
चालू महिनाभरापासून सणवारांची धामधूम सुरू झाली आहे आणि अन्नधान्यापासून कडधान्यापर्यंत, स्वयंपाकाच्या गॅसपासून मसाल्याच्या पदार्थांपर्यंत, भाजीपाल्यापासून फळांपर्यंत, पेट्रोल-डिझेलपासून दुधापर्यंत प्रत्येक गोष्टीचे भाव दररोज नवीन उंची गाठत आहेत. मुंबईत तर सुटे दूध 1 सप्टेंबरपासून तब्बल 7 रुपयांनी महागणार आहे. रुपयाचे अवमूल्यन दिवसागणिक नया नीचांक गाठत आहे. एकीकडे महागाईचा फास आणि दुसरीकडे सरकारी दडपशाहीचा गळफास या कोंडीत देशाचा श्वास कोंडला आहे. कोरोनाचे संकट बऱ्यापैकी निवळले असले तरी दडपशाहीचे संकट कायमच आहे. गणराया, तू सुखकर्ता आणि विघ्नहर्ता आहेस. लोकशाही आणि घटनेने बहाल केलेले ‘मुक्त आणि निर्भय वातावरण’ निरंकुश सत्तालालसेच्या तावडीत सापडल्याने गुदमरले आहे. गणराया, देश ‘निर्भय’ कर, एवढीच प्रार्थना आज देशातील जनता तुला करीत आहे. तिचा स्वीकार कर! अशी प्रार्थना शिवसेनेने केली आहे.