राष्ट्रीय तपास संस्थेने (NIA) अंडरवर्ल्ड गँगस्टर दाऊद इब्राहिम आणि त्याच्या ‘डी’ कंपनीच्या साथीदारांची माहिती देणाऱ्यांसाठी रोख बक्षीस जाहीर केले आहे. दाऊद इब्राहिमवर 25 लाख रुपयांचे बक्षीस जाहीर करण्यात आले आहे. तर, त्याचा जवळचा साथीदार छोटा शकीलवर 20 लाखांचे बक्षिस जाहीर करण्यात आले आहे.
दहशतवादी हल्ले करण्याची योजना
एनआयएने जारी केलेल्या पत्रकात म्हटले आहे की, दाऊद इब्राहिम कास्करला संयुक्त राष्ट्राने ‘जागतिक दहशतवादी’ म्हणून घोषित केले. दाऊद कास्कर त्याच्या जवळच्या साथीदारांसह डी-कंपनी नावाचे आंतरराष्ट्रीय दहशतवादी नेटवर्क चालवतो. शस्त्रास्त्रे, स्फोटके, ड्रग्ज आणि बनावट भारतीय चलनाची तस्करी करण्यासाठी दाऊदने भारतात डी कंपनी स्थापन केली आहे. डी कंपनी पाकिस्तानी संस्था आणि दहशतवादी संघटनांच्या सहकार्याने दहशतवादी हल्ले करण्याची योजना आखत आहे. त्यामुळे त्यांची माहिती देणाऱ्यांसाठी बक्षिसे जाहीर करण्यात आले आहेत.
दाऊदच्या साथीदारांवर जाहीर झालेले बक्षिस
1) छोटा शकिल – 20 लाख रुपये
2) अनिस इब्राहिम शेख – 15 लाख रुपये
3) इब्राहिम मुश्ताक अब्दुल रज्जाख मेमन उर्फ टायगर मेमन – 15 लाख रुपये
4) जावेद पटेल उर्फ जावेद चिकना – 15 लाख रुपये
दहशतवादी संघटनांना निधी पुरवला
एनआयएने म्हटले आहे की, डी गँग तस्करी, नार्को दहशतवाद, अंडरवर्ल्ड गुन्हेगारी सिंडिकेट, मनी लाँड्रिंग, मालमत्तेचा अनधिकृत ताबा / संपादन अशा अनेक कृत्यांत सहभागी आहे. तसेच, डी गँगकडून दहशतवाद्यांना निधी आणि आंतरराष्ट्रीय दहशतवाद्यांना सक्रिय सहकार्यही केले जाते. लष्कर-ए-तैयबा (एलईटी), जैश-ए-मोहम्मद (जेएम) आणि अल कायदासारख्या संघटनांसोबतही डी गँगचे संबंध असल्याचे एनआयएने म्हटले आहे.