भाद्रपद गणेश चतुर्थीला रत्नागिरीतील प्रसिद्ध गणपतीपुळे मंदिरात भाविकांना गाभाऱ्यात जाऊन चरणस्पर्श करण्याची मुभा असते. 150 वर्षातून ही प्रथा सुरू आहे. वर्षातून एकदाच भाविकांना ही संधी मिळते.
मुंबई: गेल्या दोन वर्षांपासून बाप्पाच्या भेटीची आस लागलेल्या गणेश भक्तांची आज काळजी मिटली. तब्बल दोन वर्षानंतर भाविकांनी विघ्नहर्त्या गणरायाचं जल्लोषात स्वागत केलं. ढोलाचा कडकडाट, गुलाल आणि फुलांची उधळण करत बाप्पाचं आगमन झालं. बाप्पाच्या आगमनाचं हे विलोभनीय चित्रं केवळ मुंबई-पुण्यातच नव्हे तर चांद्यापासून बांद्यापर्यंत दिसत होतं. राज्यभर बाप्पाच्या आगमनाच्या मिरवणुका काढण्यात आल्या. त्यामुळे संपूर्ण राज्यातील रस्ते मिरवणुकीने भरून गेले होते. अबाल वृद्ध आणि महिला वर्ग या मिरवणुकांमध्ये मोठ्या प्रमाणावर सहभागी झाला होता. पारंपारिक वेशभूषा करून भाविक या मिरवणुकांमध्ये सामिल झाले होते. गणपत्ती बाप्पा मोरया , आले रे आले गणपती आले… अशा घोषणाही यावेळी दिल्या जात होत्या. त्यामुळे संपूर्ण परिसरात उत्साह आणि चैतन्य निर्माण झालं होतं.
मुंबईत आज घरोघरी बाप्पाचं आगमन झालं. गेली दोन वर्षे कोविड संसर्ग निर्बंधांमुळे गणेशोत्सवावर मर्यादा होती. पण आता सर्व निर्बंध हटवले गेल्यामुळे पुन्हा एकदा मोठ्या जल्लोषात लाडक्या बाप्पांचे वाजत गाजत आगमन होतंय. गणेशोत्सवात जगभरातील गणेशभक्तांचे अराध्य दैवत बनलेल्या लालबागच्या राजाच्या दर्शनाकडे सर्वांचे लक्ष लागलेलं असतं. यंदा लालबागच्या राजाचा दरबार अयोध्येतील प्रभू श्री राम मंदिराच्या देखाव्याने सजलांय. पहाटे 4 वाजता लालबागच्या राजाची विधिवत पूजा करण्यात आलीय. त्यानंतर पहाटे 5.30 वाजता लालबागच्या राजाचे दर्शन गणेशभक्तांसाठी सुरू करण्यात आलेय, अशी माहिती लालबाग राजाचे मानद सचिव सुधीर साळवी यांनी दिली.
अंधेरीच्या राजाचे दर्शन दुपारी
अंधेरीचा राजा म्हणून प्रसिद्ध बाप्पाच्या मूर्तीची प्रतिष्ठापना झाली असून आज दुपारी 1 च्या नंतर बाप्पाचे दर्शन सुरू होणार आहे. अंधेरीच्या राजाची 1966 साला स्थापना करण्यात आली आहे. तेव्हा पासून हा राजा नवसाला पावतो अशी आख्यायिका गणेश भक्तात आहे. आज पहिल्या दिवशी 11.30 ते 12.20 वाजता विधिवत पूजा करून 12.30 ते 1 वाजेपर्यंत आरती आणि 1 च्या नंतर गणेशभक्तांसाठी बापांचे दर्शन खुले होणार आहे.
काकड आरतीला प्रचंड गर्दी
प्रभादेवीतील सिद्धिविनायकाचा गाभारा फुलांनी सजवला आहे. भाविक लांबून लांबून आज सिद्धिविनायक चरणी लीन होताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. आज पहाटे 5 वाजता काकड आरती झाली. यावेळी सिद्धिविनायकाच्या दर्शनासाठी भाविकांनी प्रचंड गर्दी केली होती. त्यामुळे गाभाऱ्यात भक्तिमय वातावरण झालं होतं. गेल्या दोन वर्षांच्या कोरोनाच्या निर्बंधानंतर गणेश भक्त जल्लोषात दिसत आहे.
गणपतीपुळेत भाविकांची रांगच रांग
भाद्रपद गणेश चतुर्थीला रत्नागिरीतील प्रसिद्ध गणपतीपुळे मंदिरात भाविकांना गाभाऱ्यात जाऊन चरणस्पर्श करण्याची मुभा असते. 150 वर्षातून ही प्रथा सुरू आहे. वर्षातून एकदाच भाविकांना ही संधी मिळते. गणपतीपुळे येथे श्रींच्या दर्शनासाठी सकाळपासूनच ग्रामस्थांची गर्दी झाली आहे. पहाटे 4.30 पासून ते दुपारी 12.30 पर्यंत भाविकांना या दर्शनाचा लाभ घेता येणार आहे. गणपतीपुळे पंचक्रोशीत कुठेही घरी गणपती आणला जात नाही. त्यामुळे ग्रामस्थांना दर्शन सुलभ व्हावे यासाठी सुरू केलेली प्रथा आहे.
दगडूशेठ हलवाई गणपतीला तोबा गर्दी
पुण्यातील श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीच्या दर्शनासाठी भाविकांची पहाटेपासून गर्दी झाली आहे. दगडूशेठ गणेशोत्सवाचे यंदाचे 130 वे वर्ष आहे. शिवाय कोरोनाच्या संकटानंतर दोन वर्षाने गणपती उत्सव साजरा होत असल्याने पुणेकरांनी दगडूशेठ हलवाई गणपतीच्या दर्शनासाठी तोबा गर्दी केली आहे. श्री पंचकेदार मंदिरात यंदा बाप्पा विराजमान होणार आहे. 11:37 वाजता श्री महेशगिरी महाराजांच्या हस्ते प्राणप्रतिष्ठापणा होणार आहे.
खैरेंच्या हस्ते पूजा
औरंगाबादचे ग्रामदैवत संस्थान गणपतीच्या प्रतिष्ठापनेला सुरुवात झाली. माजी खासदार चंद्रकांत खैरे यांच्या हस्ते प्रतिष्ठापना पूजा झाली. दुपारच्या सुमारास होणार संस्थान गणपती प्रतिष्ठापना करण्यात आली. यावेळी औरंगाबादमधील भाविकांनी प्रचंड गर्दी केली होती.
नागपूरच्या राजाची विधीवत पूजा
नागपूरच्या राजाची सकाळीच पूजा करण्यात आली. मंत्रोचारणेसह बाप्पाच्या स्थापनेला सुरवात झाली. नागपूरचा राजा नागपूरकरांचं दैवत म्हणून ओळखला जातो. त्यामुळे या गणपतीला भाविकांची मोठी गर्दी असते.आज विधिवत पूजा करून बाप्पाची स्थापना करण्यात आली. नागपूरचा राजाला दर वर्षी सुवर्ण अलंकारांनी सजविण्यात येते. यंदाही ही परंपरा कायम आहे.
कोल्हापूरच्या कुंभार गल्लीत जल्लोष
लाडक्या बाप्पाला घरी घेऊन जाण्यासाठी गणेशभक्त कोल्हापूरच्या कुंभार गल्लीत दाखल व्हायला सुरवात झाली आहे. गणेश फक्त सहकुटुंब कुंभार गल्लीत येत आहेत. वाद्याच्या गजरात बाप्पाचं स्वागत केलं जात आहे. कोरोनाच्या निर्बंधमुक्ततेमुळे बाप्पाचं घरोघरी आगमन होताना दिसत असून भाविकही जल्लोष करताना दिसत आहेत.
णेश चतुर्थीला सुरुवात झाली आहे. मंडळात आणि घरोघरी भक्तगण गणेशाची पूजा करत आहेत. प्रत्येक घराघरात भक्तगण गणपती बाप्पा मोरयाचा जयघोष करत आहेत. दोन वर्षांनंतर कोरोनाचा प्रभाव कमी झाल्यामुळे गणेश पूजनाचा लोकांमध्ये उत्साह आहे, त्यामुळे यावेळी गणेशाचे दर्शन आणि भक्तांना आशीर्वाद देण्याचा अत्यंत शुभ योगायोग आला आहे. सुमारे ३०० वर्षांनंतर यंदा गणेश चतुर्थीला असा योगायोग घडल्याचे ज्योतिषी सांगत आहेत, जे भाविकांसाठी अतिशय शुभ आहे.
यावेळी गणेशोत्सव पूर्ण १० दिवसांचा
गणेशोत्सवात अनेकजण १० दिवस गणपती बसवतात. तर काही लोक १ दिवस, ४ दिवस आणि ५ दिवस सुद्धा गणपती बसतात. अशा परिस्थितीत जे लोक १० दिवस गणपती बसवतात त्यांच्यासाठी चांगली गोष्ट म्हणजे यावेळी गणेशोत्सवात तिथीचा घोळ होणार नाही, जेणेकरून त्यांना संपूर्ण १० दिवस गणपतीची पूजा करता येईल.
रवियोगात गणेश चतुर्थीची पूजा
यावेळी गणेश चतुर्थीच्या दिवशी रवी नावाचा शुभ योग संपूर्ण दिवस प्रभावाखाली राहील. सूर्य ग्रहाशी संबंधित हा योग अनेक ग्रह दोष दूर करतो आणि खूप शुभ आहे. या योगात गणेशाची पूजा केल्याने सर्व प्रकारचे अडथळे दूर होतील.
यावर्षी गणेश चतुर्थीच्या दिवशी असा योगायोग घडला आहे की ४ ग्रह आपापल्या राशीत संचार करतील. सूर्य सिंह राशीत, बुध कन्या राशीत, शनी मकर राशीत, गुरू मीन राशीत आहे. असे मानले जाते की सुमारे ३०० वर्षांनंतर असे घडत आहे की गणेश चतुर्थीच्या दिवशी ४ मोठे ग्रह आपापल्या राशीत मार्गक्रमण करत आहेत. गणेश चतुर्थीच्या दिवशी ५ राजयोग देखील तयार होत आहेत आणि गुरु लंबोदर योग तयार होत आहे हा देखील योगायोग आहे. अशा वेळी विविध पदार्थ आणि मोदक अर्पण करून गणेशाची पूजा करणे खूप शुभ ठरेल.
गणपतीच्या जन्मदिवसाचा योग
यंदा गणेश चतुर्थीला असा योगायोग तयार झाला आहे, जसा गणेशाच्या जन्माच्या वेळी बनला होता. त्यामुळे हा योगायोगही गणपती जन्मदिवस योग मानला जात आहे, खरे तर गणेश चतुर्थी यावेळी बुधवारी आहे. दुपारपासून चित्रा नक्षत्राचाही प्रभाव आहे. असे मानले जाते की या योगायोगांमध्ये, देवी पार्वतीने तिच्या दैवी शक्तींनी गणपतीची मूर्ती तयार केली आणि त्याला जीवनदान दिले.
भाद्रपद महिना सुरू झाला की, वेध लागतात ते गणपती आगमनाचे. पार्थिव सिद्धिविनायक पूजन झाल्यानंतर आपल्याकडे आरत्या म्हणायची परंपरा आहे. गणेश चतुर्थीनिमित्त गणपतीच्या काही आरत्या खास आपल्यासाठी…
सुखकर्ता दुःखहर्ता
सुखकर्ता दु:खहर्ता वार्ता विघ्नाची । नुरवी पुरवी प्रेम कृपा जयाची ।।
सर्वांगी सुंदर उटी शेंदुराची । कंठी झळके माळ मुक्ताफळांची ॥१॥
जय देव, जय देव जय मंगलमूर्ती। दर्शनमात्रे मन कामना पुरती ॥धृ॥
रत्नखचित फरा तुज गौरीकुमरा । चंदनाची उटी कुमकुम केशरा ।।
हिरेजडित मुकुट शोभतो बरा । रुणझुणती नूपुरे चरणी घागरिया ॥२॥
लंबोदर पीतांबर फणिवरबंधना । सरळ सोंड वक्रतुंड त्रिनयना ।।
दास रामाचा वाट पाहे सदना । संकटी पावावे, निर्वाणी रक्षावे, सुरवरवंदना ॥३॥
॥ जय देव जय देव०॥
शेंदूर लाल चढाओ
शेंदुर लाल चढ़ायो अच्छा गजमुखको । दोंदिल लाल बिराजे सुत गौरिहरको ।
हाथ लिए गुडलद्दु सांई सुरवरको । महिमा कहे न जाय लागत हूं पादको ॥१॥
जय जय श्री गणराज विद्या सुखदाता
धन्य तुम्हारा दर्शन मेरा मन रमता, जय देव जय देव ॥ध्रु०॥
अष्टौ सिद्धि दासी संकटको बैरि । विघ्नविनाशन मंगल मूरत अधिकारी ।
कोटीसूरजप्रकाश ऐबी छबि तेरी । गंडस्थलमदमस्तक झूले शशिबिहारि ॥२॥
भावभगत से कोई शरणागत आवे । संतत संपत सबही भरपूर पावे ।
ऐसे तुम महाराज मोको अति भावे । गोसावीनंदन निशिदिन गुन गावे ॥३॥
॥ जय देव जय देव०॥
नाना परिमळ दूर्वा
नाना परिमळ दूर्वा शेंदूर शमिपत्रें । लाडू मोद्क अन्ने परिपूरित पात्रें ।।
ऐसे पूजन केल्या बीजाक्षरमंत्रे । अष्टहि सिद्धी नवनिधी देसी क्षणमात्रें ।। १ ।।
जय देव जय देव जय मंगलमूर्ती । तुझे गुण वर्णाया मज कैची स्फूर्ती ।। ध्रु० ।।
तुझे ध्यान निरंतर जे कोणी करिती । त्यांची सकलही पापे विघ्नेंही हरती ।।
वाजी वारण शिबिका सेवक सुत युवती । सर्वहि पावती अंती भवसागर तरती ।। २ ।।
॥ जय देव जय देव०॥
शरणांगत सर्वस्वें भजती तव चरणी । कीर्ती तयांची राहे जोवर शशितरणि ।।
॥ जय देव जय देव०॥
वेदशास्त्रांमाजी तूं मंगलमूर्ती
वेदशास्त्रांमाजी तूं मंगलमूर्ती। अगणित महिमा तुझा कल्याण स्फूर्ती॥
भक्तांलागी देसी विद्या अभिमत ती। मोरेश्वर नाम तुझे प्रसिद्ध या जगती ॥१॥
जय देव जय देव जय मोरेश्वरा। तुझा न कळे पार शेषा फणिवरा ॥ध्रु०॥
पुळ्यापश्ये नांदे महागणपती। माघ चतुर्थीला जनयात्रे येती।।
जें जें इच्छिति तें तें सर्वही पावती। गणराजा मज बाळा द्यावी अभिमती ॥२॥
॥ जय देव जय देव०॥
एकवीस दुर्वांकुरा नित्ये नेमेसी। आणूनि जे अर्पिती गणराजयासी॥
त्याचे तू भवबंधन देवा चुकविसी। विठ्ठलसुत हा ध्यातो तुझिया चरणासी॥ जय देव जय देव जय मोरेश्वरा॥३॥
॥ जय देव जय देव०॥
प्रार्थना
घालीन लोटांगण वंदीन चरण । डोळ्यांनी पाहिन रूप तुझे ।
प्रेमें आलिंगीन आनंद पूजन । भावे ओवाळिन म्हणे नामा ।।
त्वमेव माता पिता त्वमेव । त्वमेव बन्धु: सखा त्वमेव ।
त्वमेव विद्या द्रविणं त्वमेव । त्वमेव सर्वं मम देवदेव ।।
कायेन वाचा मनसेंद्रियैर्वा । बुध्यात्मना वा प्रकृति स्वभावात् ।
करमि यद्यत् सकलं परस्मै । नारायणायेती समर्पयामि ।।
अच्युतं केशवं राम नारायणम् कृष्णदामोदरं वासुदेवं भजे।
श्रीधरं माधवं गोपिकावल्लभम् जानकीनायकं रामचंद्र भजे ।।
हरे राम हरे राम राम राम हरे हरे
हरे कृष्ण हरे कृष्ण कृष्ण कृष्ण हरे हरे ।।
।। गणपतिबाप्पा मोरया ।। ।। मंगलमूर्ती मोरया ।।