आजपासून म्हणजेच गणेश चतुर्थीपासून दहा दिवसांच्या गणेशोत्सवाला सुरुवात झालीये. त्यातच लालबागचा राजा म्हटलं की गर्दी ही आलीच. गणेशोत्सवाच्या पहिल्या दिवसापासूनच मोठ्या संख्येने भाविक राजाच्या दर्शनासाठी येत असतात. यावेळीही भाविकांची अलोट गर्दी राजाच्या दरबारात पाहायला मिळत आहे. गणेश चतुर्थीच्या पहिल्याचं दिवशी आपल्या लाडक्या बाप्पाचं दर्शन व्हावं यासाठी भाविक गेल्या दोन दिवसांपासून रांग लावून आहेत.
मुंबई : राज्यभरात गणेशोत्सवाची धूम मोठ्या प्रमाणात पाहायला मिळत आहे. लाडक्या गणरायाचा जयघोष संपूर्ण राज्यात पाहायला मिळत आहे. राज्याची राजधानी मुंबईत देखील गणेशोत्सवाची धूम पाहायला मिळत असून, लालबागच्या राजाचे दर्शन घेण्यासाठी भाविकांनी मोठी गर्दी केली आहे. गेली दोन वर्ष करोनामुळे जगाला वेढीस धरलं. त्यातून मुंबईही सुटलेली नाही. कधीही न थांबणाऱ्या मुंबईला देखील करोनात ब्रेक लागला. याकाळात सण-उत्सवांवर पूर्णपणे बंदी घातली गेली. यामध्ये मुंबईकरांनी जर कुठल्या सणाची सर्वात जास्त प्रतीक्षा पाहिली असेल तर तो म्हणजे गणेशोत्सव. यंदा कुठल्याही निर्बंधांशिवाय गणेशोत्सव साजरा करण्याची परवानगी असल्याने मुंबईत पुन्हा एकदा गणेशोत्सवाची धूम पाहायला मिळत आहे.
बाप्पाचे दर्शन घेण्यासाठी भाविकांनी तब्बल 10 ते 15 किलोमीटर दूरपर्यंत रांगा लावल्याचे पाहायला मिळतेय. आज पहाटेपासून भविकांनी गर्दी केली आहे. दुसरीकडे मुंबईतील सिद्धिविनायक मंदिरात गणेशोत्सवानिमित्त आकर्षक फुलांची अरास करण्यात आली आहे. आज आपण गणेशोत्सवानिमित्त मुंबईतील सहा मानाचे गणपतींबद्दल जाणून घेऊयात…
1) मुंबईचा राजा गणेशगल्लीचा गणपती : गणेशगल्लीच्या गणपतीची मुंबईचा राजा अशी ख्याती आहे. मुंबईच्या राजाने यंदा काशी विश्वनाथ मंदिराचा देखावा साकारला आहे. मुंबईचा राजा यंदा विश्वकर्मा रुपात पाहायला मिळतोय. यंदा या गणपतीच्या मूर्तीची उंची तब्बल 22 फूट इतकी आहे.
2) लालबागचा राजा : त्यातच लालबागचा राजा म्हटलं की गर्दी ही आलीच. गणेशोत्सवाच्या पहिल्या दिवसापासूनच मोठ्या संख्येने भाविक राजाच्या दर्शनासाठी येत असतात. यावेळीही भाविकांची अलोट गर्दी राजाच्या दरबारात पाहायला मिळत आहे. गणेश चतुर्थीच्या पहिल्याचं दिवशी आपल्या लाडक्या बाप्पाचं दर्शन व्हावं यासाठी भाविक गेल्या दोन दिवसांपासून रांग लावून आहेत. यावेळी त्यांनी बाप्पाबद्दलच्या त्यांच्या भावना व्यक्त केल्या. नवसाला पावणारा गणपती म्हणून लालबागच्या राजाची ख्याती आहे. लालबागच्या राजाच्या दर्शनासाठी भक्त रांगा लावतात. लालबागचा राजा ज्या ठिकाणी विराजमान होतो त्याच ठिकाणी बाप्पाची मूर्ती साकारली जाते. राजाचे यंदाचे 89 वे वर्ष आहे. बाप्पाच्या दर्शनाची ओढ अशी की गेल्या दोन दिवसांपासून हे भाविक फुटपाथवर मुक्काम ठोकून बसले आहेत.
3) जीएसबी गणपती : माटुंग्यातील जीएसबी सेवा गणेश मंडळाला मुंबईतील सर्वात श्रीमंत गणपती म्हणून ओळखले जाते. या मंडळाने यंदा गणेशमूर्ती मंडप आणि इतर साहित्याचा तब्बल 300 कोटींचा विमा उतरवलाय. जीएसबीच्या गणेशमूर्तीला 68 किलो सोने आणि 327 किलो चांदीने सजवण्यात आले आहे.
4) चिंचपोकळीचा चिंतामणी : चिंचपोकळीच्या चिंतामणीचा आगमन सोहळा प्रसिद्ध असतो. बाप्पाच्या आगमनाच्या दोन महिने आधीपासूनच त्याची तयारी सुरू होते.
5) खेतवाडीचा महाराजा : मुंबईचा महाराजा अशी ओळख असलेल्या खेतवाडीची यंदाची गणेशमूर्ती तब्बल 38 फुटांची आहे. खेतवाडी गणेशोत्सव मंडळ उंच गणेशमूर्तीसाठी प्रसिद्ध आहे. यंदा या मूर्तीसमोर गुरुकुलाचा देखावा साकारण्यात आला आहे.
6) तेजुकाय मेन्शन गणपती : लालबागच्या राजाचे दर्शन घेतल्यानंतर गणेशभक्त तेजुकाय मेन्शन गणपतीचे दर्शन घ्यायला जातात. तेजुकाय गणपती बाप्पाची मूर्ती अतिशय सुंदर आणि रेखीव असते. त्यामुळे ही गणेशमूर्ती अनेकांसाठी आकर्षण ठरते.