- सिमरोझा आर्ट गॅलरी येथे २ ते ५ सप्टेंबर दरम्यान ३० कलाकारांच्या ७०हून अधिक कलाकृतींचे प्रदर्शन
अभिरक्षक अपरिमिता सप्रू ‘अॅमलगमेशन 8’ प्रदर्शनासह कलाक्षेत्रात पुनरागमन करत आहेत. यात प्रस्थापित, स्थानिक उदयोन्मुख आणि आंतरराष्ट्रीय किर्तीच्या ३० कलाकारांची चित्रे, ठसाचित्रे, सिरॅमिक्स, शिल्पे या कलाकृती आभासी पद्धतीने पाहाता येणार आहेत. यात मुंबई, पुणे, दिल्ली, कोलकाता येथील कलाकार सहभागी होणार आहेत. एक्स्पोपीडियाने आयोजित केलेली या प्रदर्शनाची आठवी आवृत्ती २ ते ५ सप्टेंबर २०२२ दरम्यान ब्रीच कॅण्डी येथील सिमरोझा आर्ट गॅलरीत पार पडेल. या प्रदर्शनात अमूर्त, अर्ध-अमूर्त, वास्तववादी, प्रतिकृती आणि आध्यात्मिक शैलीतील ७० कलाकृती सादर केल्या जातील. या कलाकृती साकारण्यासाठी मिश्र माध्यम, अॅक्रेलिक, जलरंग, तैलरंग, पेन-शाई, पेन्सिल रंग, इत्यादी माध्यमांचा वापर करण्यात आला आहे. यासह फायबरग्लास, सिरॅमिक्स आणि कांस्य यांची जबरदस्त ८ शिल्पेही प्रदर्शनात असणार आहेत. गेल्या १० वर्षांपासून अपरिमिता आणि त्यांची कंपनी एक्स्पोपीडिया कलेच्या माध्यमातून सामाजिक ऋण फेडत आहेत. या प्रदर्शनातून झालेल्या विक्रीतून मिळणार्या रकमेपैकी काही रक्कम जुहूच्या ‘रोटरी क्लब अॉफ मुंबई’च्या सामाजिक प्रकल्पांसाठी दान केली जाणार आहे. हे प्रकल्प असे आहेत – १) आधार – बदलापूर, नाशिक, जळगाव आणि सोलापूर येथे पालकांसोबत किंवा पालकांशिवाय राहणार्या बौद्धिकदृष्ट्या अक्षम अशा ३३५हून अधिक व्यक्तींचे घर आहे. २) साक्षी – लहान मुलांच्या लैंगिक शोषणास प्रतिबंध करण्यासाठी जनजागृती करणे हा या प्रकल्पाचा उद्देश आहे.