मुंबई, 26 ऑगस्ट, २०२२ : उद्योगांमधील अधिकारी, व्यवस्थापन शैक्षणिक संस्था, संशोधक, धोरणकर्ते आणि इतर भागधारक यांना भविष्यातील आव्हानांकरीता सज्ज राहता यावे, यासाठी एक व्यासपीठ उभे करण्याकरीता ‘असोसिएशन ऑफ इंडियन मॅनेजमेंट स्कूल्स’ आणि ‘गुरू नानक इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट स्टडीज’ यांच्यातर्फे एक महत्त्वाचा कार्यक्रम आयोजित करण्यात येत आहे.
‘जीएनआयएमएस कॅम्पस’मध्ये प्रत्यक्षपणे आयोजित करण्यात येणार्या या तीन दिवसीय अधिवेशनात लोकांच्या सध्याच्या आवडीच्या विषयांवर लक्ष केंद्रित करणारी पूर्ण सत्रे असतील. यामध्ये डॉक्टरल परिसंवाद, मार्केटप्लेस सिम्युलेशन कार्यशाळा, जागतिक मान्यताप्राप्त गोलमेज परिषद, सीईओ पॅनेल चर्चा, संशोधन अहवाल सादरीकरण असे कार्यक्रम घेण्यात येतील. आज२७ ऑगस्ट रोजी समारोप या कार्यक्रमाचा समारोप होणार आहे
‘एआयएमएस’चे अध्यक्ष डॉ. अजित सिंग थेटी यांच्या मते, “भारतीय व्यवस्थापक पुरेसे सक्षम आहेत आणि जागतिक स्तरावर आपला ठसा उमटवत आहेत. भारतातील व्यवस्थापन शिक्षणही विकसित होत आहे आणि जागतिक मानकांशी ते जुळणारे आहे. म्हणूनच, व्यवस्थापन शिक्षणामध्ये सतत सहयोग आणि सुधारणा यांची गरज आहे.”
या अधिवेशनाच्या परिकल्पनेशी सुसंगत अशा एका परिसंवादात, व्यवसाय व्यवस्थापनातील प्रतिष्ठित शैक्षणिक संस्थांचे सदस्य, शैक्षणिक व कॉर्पोरेट क्षेत्रातील अधिकारी आणि धोरणकर्ते हे व्यवस्थापन अभ्यासाच्या भविष्यातील महत्त्वाच्या घडामोडींबद्दल चर्चा करणार आहेत. कोविडपश्चात काळातील बाजारपेठेतील परिस्थितीत आणि आर्थिक-राजकीय असुरक्षिततेच्या काळात कार्यक्षमतेने काम करण्यासाठी व्यवस्थापकांना प्रशिक्षण कसे द्यावे, यावर हे तज्ज्ञ आपले विचार मांडतील.
‘एआयएमएस’चे कार्यक्रम संचालक डॉ. किरण यादव म्हणाले, “आपल्या एमबीएच्या विद्यार्थ्यांचे भविष्य बदलण्यासाठी व्यवस्थापन शिक्षणाची पुनर्रचना करणे हा केवळ विशेषाधिकार राहिलेला नसून ती आता गरज आहे. इतर जगाने हेवा करावा, अशी प्रगती भारत करीत आहे ही वस्तुस्थिती लक्षात घेऊन, आमच्या व्यवस्थापकांचा आणि त्यांच्या नेतृत्व कौशल्याचा कसोटीचा काळ सध्या सुरू आहे, असे म्हणावे लागेल. सर्व व्यवस्थापन शिक्षण संस्थांची आपसांतील भागीदारी आणि सहयोग यांतून जागतिक स्तरावर प्रगतीशील व्यावसायिक संस्था तयार करण्याच्या दृष्टीने भारतीय व्यवस्थापन शिक्षण प्रणाली बळकट होईल.”