अहमदाबाद : गुजरातमध्ये गोध्रा दंगलीवेळी बिलकिस बानो या महिलेवर सामूहिक बलात्कार केल्या प्रकरणातील ११ दोषींची सुटका करण्यात आली. ११ दोषींचं मिठाई देऊन स्वागत करण्यात आलं. गुजरात सरकारच्या माफी धोरणानुसार हा निर्णय घेण्यात आला. गुजरात सरकारच्या या निर्णयानंतर ११ दोषी गोध्रा तुरुंगातून बाहेर पडले. या ११ दोषींना बिलकिस बानो या महिलेवर सामूहिक बलात्कार आणि तिच्या कुटुंबातील ७ जणांच्या हत्येप्रकरणी जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली होती. सुटका झालेल्या शैलेश भट्ट यांनी ते राजकारणाचा बळी असल्याचं म्हटलं आहे.
राजकारणाचा बळी झाल्याचं वक्तव्य
बिलकिस बानो सामूहिक बलात्कार प्रकरणातील दोषींपैकी शैलेश भट याने तो राजकारणाचा बळी झाच्याचं म्हटलं आहे. शैलेश भट या ६३ वर्षीय सुटका झालेल्या दोषीनं त्याला अटक करण्यात आली त्यावेळी सत्ताधारी भाजपचा स्थानिक पदाधिकारी होतो, असं म्हटलं आहे. गोध्रा तुरुंगातून बाहेर पडल्यावर तो त्याचा भाऊ आणि अन्य दोषींसह गुजरातच्या दाहोदमधील सिंगोर गावी गेला.
दोषींचं मिठाई देऊन स्वागत
बिलकिस बानो सामूहिक बलात्कार प्रकरणातील ११ दोषींची सुटका झाल्यानंतर तुरुगांबाहेर मिठाई देऊन स्वागत करण्यात आलं. याचा एक व्हिडिओ देखील समोर आला आहे. त्यामध्ये सर्व दोषींना मिठाई देण्यात आली. काही जणांनी दोषींना नमस्कार देखील केले.
राधेश्याम शाही, जसवंत चतुरभाई नाई, केशुभाई वदानिया, बकाभाई वदानिया, राजीवभाई सोनी, रमेशभाई चौहान, शैलेशभाई भट्ट, बिपिन चंद्र जोशी, गोविंदभाई नाई, मितेश भट्ट आणि प्रदीप मोढिया यांच्या विरोधात एफआयआर दाखल करण्यात आली होती. आरोपींना २००४ मध्ये अटक करण्यात आली होती.
नेमकं प्रकरण काय?
गुजरातमध्ये २००२ मध्ये गोध्रा दंगल झाली होती. ३ मार्च २००२ मध्ये दाहोद जिल्ह्यातील रंधिकपूर गावात बिलकिस बानो यांच्यांवर सामुहिक बलात्कार झाला होता. तर, त्यांच्या कुटुंबातील सात लोकांची हत्या करण्यात आली होती. बिलकिस बानो यांच्यावर बलात्कार झाला त्यावेळी त्या पाच महिन्यांच्या गर्भवती होत्या. २००८ मध्ये या प्रकरणी आरोपींना जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली होती. गुजरात सरकारनं माफी धोरणानुसार दोषींची सुटका केली. एमआयएमचे अध्यक्ष असदुद्दीन ओवेसींनी याबाबत सवाल उपस्थित केले आहेत.