मुंबई : बँक ऑफ बडोदा-मुंबई विभागीय टेबल टेनिस संघ निवड चाचणी स्पर्धेमधील पुरुष एकेरीत अंकित धीकोनियाने वेंकटेश प्रसन्नाचे आव्हान ११-९, ११-८ असे संपुष्टात आणून विजेतेपदाला गवसणी घातली. दुसऱ्या सेटच्या मध्याला ६-४ अशी आघाडी घेत बरोबरी साधू इच्छिणाऱ्या वेंकटेश प्रसन्नाला निर्णायक क्षणी अंकितने आपल्या भात्त्यातील अचुक फटक्यांच्या आतषबाजीद्वारे विजय साकारला. परिणामी वेंकटेशला अंतिम उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले. तृतीय क्रमांकाच्या लढतीमध्ये राहुल दासने हेमंत मिस्त्रीचा १४-१२, ११-७ असा पराभव केला. आयडियल स्पोर्ट्स अकॅडमीच्या सहकार्याने ही स्पर्धा खार जिमखान्यातील आठ टेबल टेनिसवर रंगतदार झाली. डेप्युटी जनरल मॅनेजर श्री. पी.के. राऊत व असिस्टंट जनरल मॅनेजर-एचआर श्रीमती लिपिका पाढी यांनी विजेत्या-उपविजेत्यांना पुरस्कार देऊन गौरविले.
बँक ऑफ बडोदा-मुंबई विभागीय टेबल टेनिस स्पर्धेमधील उपांत्य फेरीच्या सामन्यात वेंकटेश प्रसन्नाने मोक्याच्या क्षणी अचूक फटक्यांची उधळण करीत २-१ असा निसटता विजय नोंदविला. तब्बल ४० मिनिटे झालेल्या अतितटीच्या लढतीत वेंकटेशने राहुल दासला १४-१२, ७-११,११-९ असे चकवून अंतिम फेरी गाठली. दुसऱ्या उपांत्य सामन्यात अंकित धीकोनियाने रॅलीवर भर देत सावध खेळ केला आणि हेमंत मिस्त्रीला ११-८, ११-३ असे सहज हरविले. तत्पूर्वी झालेल्या उपांत्यपूर्व फेरीमध्ये अंकित धीकोनियाने अतुल कुमारचा ११-४,११-३ असा, हेमंत मिस्त्रीने विनय इरकलचा १०-१२, ११-८, ११-८ असा, वेंकटेश प्रसन्नाने सनी थॉमसचा ११-८, ११-२ असा तर राहुल दासने साहिल परातेचा ११-८, ११-७ असा पराभव केला. उपांत्य फेरी गाठणाऱ्या चार खेळाडूंची बँक ऑफ बडोदाच्या मुंबई विभागीय संघामध्ये निवड झाली असून हा संघ २५ ऑगस्टला पुणे येथे होणाऱ्या अखिल भारतीय स्तरावरील बँक ऑफ बडोदा-आंतर विभागीय टेबल टेनिस स्पर्धेत मुंबई विभागाचे प्रतिनिधित्व करणार आहे.