मुंबई : सामनावीर महेश सनगर, कल्पेश भोसले, रोहन जाधव यांची दमदार फलंदाजी व रोहन ख्रिस्तिअन, रुपेश कोर्वे, डॉ.परमेश्वर मुंडे यांची अचूक गोलंदाजीमुळे कस्तुरबा हॉस्पिटलने नवी मुंबईच्या केडीए हॉस्पिटलवर ४५ धावांनी मात केली आणि ओम्नी ट्रॉफी आंतर हॉस्पिटल सी डिव्हिजन टी-२० क्रिकेट स्पर्धेच्या अंतिम फेरीत धडक दिली. प्रतिक शेलारने उत्तम प्रतिकार करूनही केडीए हॉस्पिटल-नवी मुंबई संघाला पराभवास सामोरे जावे लागले. कस्तुरबा हॉस्पिटलची अंतिम फेरीत गाठ बलाढ्य ब्रीच कॅन्डी हॉस्पिटल संघाविरुध्द २४ फेब्रुवारी रोजी शिवाजी पार्क-माहीम ज्युवेनाईल खेळपट्टीवर पडणार आहे. कौंटी क्रिकेटपटू ओमकार मालडीकर, आयडियल स्पोर्ट्स अकॅडमीचे कार्याध्यक्ष गोविंदराव मोहिते, शिवछत्रपती पुरस्कार विजेते लीलाधर चव्हाण आदी मंडळींच्या प्रमुख उपस्थितीत अंतिम लढत होईल.
आयडियल स्पोर्ट्स अकॅडमी, आयडियल ग्रुप व ओम्नी ग्लोबल स्पोर्ट्स मॅनेजमेंट आयोजित सी डिव्हीजनच्या उपांत्य फेरीमध्ये प्रथम फलंदाजी करतांना कस्तुरबा हॉस्पिटलने मर्यादित षटकात ५ बाद १२० धावांचा टप्पा गाठला. त्यासाठी महेश सनगर (२४ चेंडूत ३५ धावा, ४ चौकार), कल्पेश भोसले (२८ चेंडूत २९ धावा, २ चौकार) व रोहन जाधव (११ चेंडूत २० धावा, ४ चौकार) यांची आक्रमक फलंदाजी कस्तुरबा हॉस्पिटलला उपयुक्त ठरली. स्वप्नील चव्हाण (१४ धावांत २ बळी), मिल्टन लोबो (१६ धावांत २ बळी), अब्दुल अन्सारी (२२ धावांत १ बळी) यांनी छान गोलंदाजी केली. रोहन ख्रिस्तिअन (१५ धावांत ३ बळी), रुपेश कोर्वे (६ धावांत २ बळी), डॉ. परमेश्वर मुंडे (१५ धावांत २ बळी), अंकुश जाधव (१२ धावांत १ बळी), सुदर्शन (२ धावांत १ बळी), मंगेश आगे (१३ धावांत १ बळी) यांच्या विकेट घेणाऱ्या अचूक गोलंदाजीमुळे केडीए-नवी मुंबईची आठव्या षटकाला ७ बाद २९ धावा अशी नाजूक स्थिती झाली. प्रतिक शेलार (१७ चेंडूत २५ धावा, ३ चौकार), जयेश तांबे (४ चेंडूत १० धावा, १ षटकार व १ चौकार), संदीप देशमुख (९ चेंडूत १० धावा, १ चौकार) यांनी डाव सावरण्याचा प्रयत्न करूनही केडीए संघ ११.४ षटकात ७५ धावसंख्येवर गारद झाला. परिणामी कस्तुरबा हॉस्पिटलने ४५ धावांनी शानदार विजय मिळवीत अंतिम फेरीत प्रवेश केला. सामन्यातील उत्कृष्ट खेळाडू महेश सनगर व प्रतिक शेलार यांना क्रिकेटपटू चंद्रकांत करंगुटकर, सत्कारमूर्ती अंकुश जाधव, क्रिकेट प्रशिक्षक दिनेश हातिम, प्रदीप क्षीरसागर आदी मंडळींच्या उपस्थितीत गौरविण्यात आले.