मुंबई: नवी दिल्ली : भारताला स्वातंत्र्य मिळून 75 वर्ष पूर्ण झाल्याने यंदा अमृत महोत्सव साजरा करण्यात येत आहे. यानिमित्ताने भारत सरकारकडून विशेष अभियान राबवण्यात येत आहे.
आजादी के 75 साल या विशेष मोहिमेत सहभागी होण्याचं भारत सरकार आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नागरिकांना विशेष आवाहन केलं आहे. या मोहिमेत बॉलिवूडचे स्टार कलाकार, साऊथचे सुपरस्टार आणि क्रीडा-कला विश्वातील दिग्गज सहभागी झाले आहेत.
या मोहिमेत अमिताभ बच्चन, विराट कोहली ते प्रभास, अनुपम खेर, आशा भोसले, कपिल देव, नीरज चोप्रा यांच्यासह अनेक सेलिब्रिटी दिसत आहेत. संस्कृती विभागाने व्हिडीओ शेअर करत लिहिले- प्रत्येक घरात तिरंगा.. घरोघरी तिरंगा… आपल्या देशाला 75 वर्षे पूर्ण होत असताना आपला तिरंगा, आपल्या अभिमानाचे आणि एकतेचे प्रतीक असलेला राष्ट्रध्वज… हा स्वातंत्र्य दिन उत्साहाने साजरा करूया असं कॅप्शन दिलं आहे.
या व्हिडीओमध्ये देशातील सुंदरता, भावना, ताकद आणि विविधतेतील एकता असं सांस्कृतिक दर्शन घडवण्यात आलं आहे. या व्हिडीओमधील गीत सोनू निगम आणि आशा भोसले यांनी गायलं आहे. तर विराट कोहली, अनुष्का शर्मा, साऊथचे सुपरस्टार, अनेक सेलिब्रिटी यामध्ये सहभागी झाल्याचं पाहायला मिळालं आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 15 ऑगस्ट रोजी सर्व नागरिकांना आपल्या घरामध्ये ध्वज फडकवण्याचं आणि सोशल मीडियावरही राष्ट्रध्वज अपलोड कऱण्याचं आवाहन नागरिकांना केलं आहे. ही मोहिम एक मोहीम नसून त्याचं रुपांतर जन चळवळीत करण्याचं आवाहन पंतप्रधान मोदींनी केलं आहे.