मुंबई: NHI NEWS AGENCY
मुंबई क्रिकेट असोसिएशन-एमसीए स्टाफ क्रिकेट संघाने पहिल्याच पदार्पणात टाईम्स शिल्ड एफ डिव्हिजन क्रिकेट स्पर्धेचे विजेतेपद पटकाविले. बीकेसी येथील शरद पवार अकॅडमी-खेळपट्टीवर एमसीए स्टाफ संघाने ग्रुप सॅटेलाईट कंपनीचा ३ विकेटने पराभव करून अजिंक्यपदाला गवसणी घातली. एमसीएला सर्वेश दामलेचे दमदार नाबाद अर्धशतक व विनीत देढीयाची डावखुरी फिरकी गोलंदाजी विजयासाठी उपयुक्त ठरली. एमसीएच्या पदाधिकाऱ्यांनी विजयी खेळाडूंचे अभिनंदन केले.
ग्रुप सॅटेलाईट संघाला नाणेफेक जिंकून एमसीए विरुध्द प्रथम फलंदाजीचा निर्णय लाभदायक ठरला नाही. सलामीवीर सुरज शर्मा (४६ धावा) व रोहित साहू (२२ धावा) यांनी उत्तम फलंदाजी करूनही ग्रुप सॅटेलाईटचा डाव ४० षटकात १४४ धावसंख्येवर गडगडला. त्याचे श्रेय डावखुरा फिरकी गोलंदाज विनीत देढीया (२२ धावांत ३ बळी) व दीपक पारतेकी (२७ धावांत २ बळी), डावखुरा मध्यमगती गोलंदाज अमोघ पंडित (३३ धावांत २ बळी) यांच्या प्रभावी माऱ्याला ध्यावे लागेल. विजयी लक्ष्य गाठताना चौथ्या क्रमांकावर फलंदाजीस उतरलेल्या सर्वेश दामलेने (नाबाद ५४ धावा) ६ चौकारांच्या सहाय्याने एका बाजूने शेवटपर्यंत अर्धशतकी किल्ला लढविला. परिणामी एमसीए संघाने ४४ व्या षटकाला ७ बाद १४८ धावा फटकावून अंतिम विजय साकारला. सलामीवीर डावखुरा विशाल चित्रकार (१८ धावा), सुशांत बावडेकर (१४ धावा), सुनील लिंगायत (२२ धावा) यांनी प्रारंभी छान फलंदाजी केली.
*********************