MUMBAI NHI
आयडियल स्पोर्ट्स अकॅडमी व आरएमएमएस आयोजित राष्ट्रीय मिल मजदूर संघाचे अध्यक्ष सचिनभाऊ अहिर चषक १५ वर्षाखालील शालेय मुलामुलींच्या विनाशुल्क बुध्दिबळ स्पर्धेमध्ये विसनजी अकॅडमी स्कूल-अंधेरीचा १० वर्षीय पृथ्वीराज देढीयाने विजेतेपदाला गवसणी घातली. १२ वर्षाखालील गटात आक्रमक खेळ करतांना एका चुकीच्या चालीमुळे तृतीय क्रमांकावर समाधान मानावे लागणाऱ्या पृथ्वीराजने १५ वर्षाखालील चम्पियन ऑफ चम्पियन्सच्या मुख्य लढतीमध्ये उत्तम डावपेचांसह सावध चाली रचल्या आणि साखळी पाचही सामने जिंकून सर्वाधिक ५ गुणांसह बाजी मारली.
अंतिम उपविजेतेपदासाठी मात्र रोझरी हायस्कूल-डॉकयार्डचा अराहन खान, होली एंजेल्स स्कूल-डोंबिवलीचा रेयांश धनावडे व विसनजी अकॅडमी स्कूल-अंधेरीची अनन्या चव्हाण यांच्यामध्ये समान साखळी ४ गुणांसह चुरस निर्माण झाली. अखेर सरस सरासरीच्या जोरावर अराहन खानने द्वितीय क्रमांकावर झेप घेतली. रेयांश धनावडेने (४ गुण) तृतीय, अनन्या चव्हाणने (४ गुण) चतुर्थ, जीयांश पटेलने (३ गुण) पाचवा, काश्वी बन्सलने (३ गुण) सहावा, शुभदा पाताडेने (३ गुण) सातवा आणि अर्णव सोनावणेने (३ गुण) आठवा पुरस्कार मिळविला. परेल येथील आरएमएमएस सभागृहामध्ये स्पर्धेचा पारितोषिक वितरण समारंभ क्रीडाप्रेमी राजन लाड, सादीक खान, विलास डांगे, प्राचार्य केतन सारंग, ज्येष्ठ पत्रकार सुहास जोशी, क्रीडा शिक्षक अविनाश महाडिक, शिवछत्रपती पुरस्कार विजेते लीलाधर चव्हाण आदी मंडळींच्या उपस्थितीत पार पडला.
******************************