MUMBAI\NHI NEWS AGENCY
राष्ट्रीय मिल मजदूर संघाचे अध्यक्ष सचिनभाऊ अहिर चषक १५ वर्षाखालील शालेय मुलामुलींच्या विनाशुल्क बुध्दिबळ स्पर्धेमध्ये दुसऱ्या फेरीअखेर रोझरी हायस्कूल-डॉकयार्डचा अराहन खान, होली एंजेल्स स्कूल-डोंबिवलीचा रेयांश धनावडे, विसनजी अकॅडमी स्कूल-अंधेरीचा पृथ्वीराज देढीया यांनी प्रत्येकी दोन गुण नोंदवीत चँम्पियन ऑफ चँम्पियन्ससाठी चुरस निर्माण केली आहे. अराहन खानने राणीच्या सहाय्याने अचूक चाली रचून उदयोन्मुख सबज्युनियर बुध्दिबळपटू शुभदा पाताडेचा २६ व्या मिनिटाला पराभव केला.
परेल येथील आरएमएमएस सभागृहामधील १५ वर्षाखालील गटात रेयांश धनावडेने हत्ती व घोड्याच्या सहाय्याने उत्तम डावपेच आखत अनन्या चव्हाणला २४ मिनिटात शह दिला आणि विजयीदौड कायम राखली. अन्य सामन्यात पृथ्वीराज देढीयाने अनिशा शेखचा, प्रिन्स राठोडने विनय गावडेचा, समृध्दी खरातने मयुरेश हम्बीरेचा, सिध्दार्थ कांबळेने यश परमारचा तर अर्णव गावंडने आयुष म्हेत्रेचा पराभव केला. चँम्पियन ऑफ चँम्पियन्स लढतींप्रसंगी राष्ट्रीय मिल मजदूर संघाचे सरचिटणीस गोविंदराव मोहिते यांनी मुंबई व ठाणे जिल्ह्यातील १५ वर्षाखालील ३२ सबज्युनियर खेळाडूंना शुभेच्छा दिल्या.