ज्येष्ठ क्रीडा पत्रकार स्व. आत्माराम मोरे स्मृती आंतर शालेय सुपर लीग विनाशुल्क कबड्डी स्पर्धेमधील मध्य मुंबई विभागातून ताराबाई मोडक हायस्कूल-दादर पूर्व संघाने प्रथम क्रमांक पटकाविला. चुरशीच्या निर्णायक सामन्यात ताराबाई मोडक हायस्कूलने डॉ. अँटोनियो डासिल्व्हा हायस्कूल-दादर पश्चिम संघाचा २१ गुणांनी पराभव केला. अष्टपैलू स्वरूप कडूला सामनावीर पुरस्कार देऊन प्रशिक्षक प्रॉमिस सैतवडेकर, क्रीडा शिक्षिका प्रीतम पाटील, संतोष सावंत व शिवछत्रपती पुरस्कार विजेते लीलाधर चव्हाण यांनी डॉकयार्ड येथील एकनाथभाई बांदल क्रीडांगणात गौरविले.
आत्माराम मोरे प्रतिष्ठान व आयडियल स्पोर्ट्स अकॅडमी आयोजित मध्य मुंबई विभाग शालेय कबड्डी स्पर्धेमधील निर्णायक सामन्यामध्ये डासिल्व्हा हायस्कूलला मोडक हायस्कूलने स्वरूप कडूच्या चौफेर चढायांमुळे पहिल्या डावात ४२-२० अशी घेतलेली आघाडी भारी पडली. उत्तरार्धात उत्तम सांघिक खेळ करूनही डासिल्व्हा हायस्कूलला मोडक हायस्कूलकडून ६८-४७ असा पराभव पत्करावा लागला. शालेय सुपर लीग स्पर्धेच्या मुख्य साखळी लढतींना ७ फेब्रुवारीपासून प्रारंभ होणार आहे. सुपर लीग अ विभागात माणेकलाल मेहता एमपीएस, समता विद्यालय, अफॅक हायस्कूल, चुनाभट्टी एमपीएस आणि सुपर लीग ब विभागात ताराबाई मोडक हायस्कूल, अँटोनियो डासिल्व्हा हायस्कूल, मुक्तांगण हायस्कूल, अँटोनियो डिसोझा हायस्कूल संघांचा समावेश असलेली पात्रता फेरीमधून मुख्य विभागवारी संघटन समितीचे अध्यक्ष अश्विनीकुमार मोरे व गोविंदराव मोहिते यांनी जाहीर केली. स्पर्धेचा अंतिम सामना १२ फेब्रुवारीला माणेकलाल मैदान, घाटकोपर-पश्चिम येथे होणार आहे.