श्रावण महिन्याच्या पहिल्या सोमवार निमित्त कोकणातील
श्री मार्लेश्वर या जागृत देवस्थानाविषयी थोडक्यात…
महाराष्ट्राचे वैभव असलेल्या सह्याद्री पर्वतरांगांमधील कडेकपारीतील एका शिखरावर भगवान शंकरांचे श्री मार्लेश्वर हे देवस्थान वसलेले आहे. वनश्रीने नटलेला सह्याद्री म्हणजेच निसर्गाचा आविष्कारच! त्यातच मार्लेश्वर म्हणजे नागमोडी पर्वतरांगा. जणू निसर्गसागरावर उमटणाऱ्या सोनेरी लाटाच! या निर्जन, निरव शांतता असलेल्या अरण्यात आध्यात्मिक उपासकांसाठी अभंग शांतता भरून राहिली आहे. श्री क्षेत्र मार्लेश्वर म्हणजे योगसाधकास आध्यात्मिक साधनेसाठी एक उत्कृष्ट तपोवनच आहे.
संगमेश्वर तालुक्यातील देवरुख शहरापासून सुमारे १५ कि.मी. आणि आंगवली गावापासून ११ कि.मी. अंतरावर अतिशय दुर्गम ठिकाणी असलेले हे पवित्र आणि जागृत देवस्थान अत्यंत प्राचीन आहे. नैसर्गिकदृष्ट्या अतिशय विलोभनीय असणाऱ्या या ठिकाणी माणूस अक्षरश: हरवून जातो. भोवतालच्या रमणीय परिसराचा व हिरव्यागार वनश्रीचा आस्वाद घेण्यात दंग होतो. उंच उंच कडेकपारी पर्वतांमधूनच वाहणारी ‘बावनदी’; त्यामध्ये बारमाही ओतणारा ‘धारेश्वर’ धबधबा. तसेच लतावेलींची सोबत आणि पक्ष्यांचे कुजन प्रसन्नतेला वरदान आहे. पावसाळ्यात किंवा पावसाळा संपता संपता श्री क्षेत्र मार्लेश्वरला भेट देण्याची मजा आणखीनच वेगळी असते.
श्री क्षेत्र मार्लेश्वर बसस्थानकापासून पुढे अरुंद नागमोडी सिमेंटच्या पायऱ्यांची पक्की पायवाट आहे. घनदाट जंगल, खाली खोल दरी, माथ्यावर सह्याद्रीची शिखरे पाहत असताना अनोख्या विश्वात कधी पोहचतो याचे भानच राहत नाही. देवळाचा साडेतीन फुटी दरवाजा व गाभारा गुहास्वरूपाचा असून तो सुरक्षित आहे. एकावेळी एकच व्यक्ती आत जाऊ शकते किंवा बाहेर येऊ शकते. गाभाऱ्यात मात्र २५ माणसे उभी राहू शकतात. ही गुहा पांडवकालीन असल्याचे जनमत आहे. गाभाऱ्यात शंकराची स्वयंभू पिंड आहे. सोबत पाण्याचे कुंड असून खोलवर गेलेली विवरे आहेत. याठिकाणी विविध प्रकारचे साप व नाग मुक्तपणे संचार करताना दिसतात. मात्र ते कोणालाही इजा करत नाहीत. वाटेत खोडकर `वानर`सेना पर्यटकांंची आणि भाविकांची मने रिझवतात. या तीर्थक्षेत्राचे पावित्र्य राखण्यासाठी महाराष्ट्र शासन, स्थानिक लोकप्रतिनिधी, स्थानिक स्वयंसेवी संस्था, सामाजिक सांस्था, पत्रकार, स्वयंसेवक श्री क्षेत्र मार्लेश्वर ट्रस्ट, मारळ ग्रामपंचायत व अन्य समिती पदाधिकारी, सदस्य, पोलीस यंत्रणा प्रयत्न करत असतात. भाविकांना त्रास होऊ नये, म्हणून दक्षता घेतली जाते. शिवाय स्वच्छता राखण्याचे कामही चोख बजावले जाते. अनेक सुखसोई उपलब्ध करून देण्यासाठी समितीतर्फे सतत प्रयत्न असतात.
मार्लेश्वरचे दर्शन घेण्यासाठी भाविकांची येथे र्वषभर रीघ असते. शालेय सहली याचठिकाणी मोठ्या प्रमाणात येत असतात. दर महिन्याच्या सोमवार व शनिवारी तसेच सुट्टीच्या दिवशी व श्रावण महिन्यात, महाशिवरात्री, दत्तजयंती या दिवशी तर भाविकांचा महासागर लोटतो. जानेवारी महिन्यात तर येथे खूपच गर्दी असते. कोकणवासीय चाकरमान्यांचे श्रद्धास्थान असलेल्या मार्लेश्वरचा जत्रोत्सव असतो. १३ व १८ जानेवारी दरम्यान होणाऱ्या जत्रोत्सवाला लाखो भाविक हजेरी लावतात.
पूर्वी मारळ, आंगवली या गावांना फारसे कोणी ओळखत नव्हते. परंतु आज मारळ-आंगवली म्हणजे मार्लेश्वर व मार्लेश्वर म्हणजे आंगवली-मारळ हे समीकरण झाले आहे. या यात्रेसाठी भाविक पायी, सायकल व इतर खासगी वाहने, एसटी बसेसने येत असतात. मुंबई येथून अनेक भाविक ग्रुपने बस करून यात्रेसाठी जातात. परळ, कुर्ला, मुंबई सेंट्रल, ठाणे, बोरिवली याठिकाणाहून तसेच कोल्हापूर, सांगली, रत्नागिरी, साखरपा, देवरूख, संगमेश्वर, सावंतवाडी या ठिकाणाहून महाराष्ट्र राज्य परिवहन मंडळातर्फे एसटीची सोय केलेली असते.
मारळ-आंगवलीमध्ये या काळात दिवाळी साजरी होत असते. अंगणात रांगोळी, दरवाजावर तोरण, रंगरंगोटीही करून भाविकांचे, नातेवाईकांचे स्वागतच केले जाते. हजारो गाड्या ये-जा करत असतात. सारा परिसर ‘हर हर महादेवऽऽऽ..’, ‘हर हर मार्लेश्वरऽऽऽ..’ या जयघोषाने दुमदुमत असतो. आंगवली गावामध्ये असणारे माल्रेश्वर देवालय (मठ) व मारळचे श्री क्षेत्र माल्रेश्वर देवस्थानचे पावित्र्य जपणे प्रत्येकाच्या हाती असते. कारण ही दोन्ही मंदिरे वैशिष्ट्यपूर्ण आहेत.
याठिकाणी भाविक मद्यपान करून येऊ शकत नाहीत. शिवाय मांसाहार केलेलाही चालत नाही. या बाबींचा विचार न करता आलेल्यांना त्या-त्या वेळी नैसर्गिक आपत्तींचा सामना करावा लागला असल्याचे येथील ज्येष्ठ नागरिकांकडून सांगितले जाते.
येथील धारेश्वर धबधब्याखाली प्रत्येक भाविक स्नान करून शुचिर्भूत होऊनच माल्रेश्वरचे दर्शन घेतात. येथे स्नान करणे हा एक अनोखा आनंद असतो! वर्षा सहलीसाठीही येथे दरवर्षी हजारो पर्यटक येत असतात. आपणही एक वेळ येथील जत्रोत्सवाचा किंवा मार्लेश्वर तीर्थक्षेत्राचा अनुभव घ्यावा. येथील निसर्गसौंदर्य, धारेश्वर धबधबा आपणास येथे पुन्हा पुन्हा येण्यास आमंत्रित करत असतो.
मार्लेश्वर देवालय (मठ) व श्री क्षेत्र मार्लेश्वर तीर्थस्थान ग्रामदैवत तितक्याच निसर्गरम्य गावात वासलेले असून मनाला ओढ लावणारे, स्मृति चिरंतन करणारे, पुन्हा-पुन्हा पाहात राहावे असेच आहे. भाविकांनी श्री क्षेत्र मार्लेश्वरला अवश्य भेट देऊन आनंद लुटावा.
‘हर हर महादेवऽऽऽ..!!’ ‘हर हर मार्लेश्वरऽऽऽ..!!’
शांताराम गुडेकर
विक्रोळी (प.)