तीन अडकून सीताराम… नाव ऐकून जरा वेगळंच वाटलं ना? हे असं कसं नाव? तर हा कोल्हापूरातील एक वाक्प्रचार आहे. अर्थात याचा अर्थ तुम्हाला हा चित्रपट आल्यावरच कळेल. सुप्रीम मोशन पिक्चर्स प्रा. लि. आणि नितीन वैद्य प्रोडक्शन्स प्रस्तुत ‘तीन अडकून सीताराम’ या चित्रपटाचे लेखन, दिग्दर्शन हृषिकेश जोशी यांनी केले असून लालासाहेब शिंदे, राजेंद्र शिंदे आणि नितीन वैद्य या चित्रपटाचे निर्माते आहेत. या चित्रपटात कोण प्रमुख भूमिकेत दिसणार हे जाणून घेण्यासाठी मात्र थोडी प्रतीक्षा करावी लागणार आहे. दुनिया गेली तेल लावत, अशी टॅगलाईन असणारा हा चित्रपट २९ सप्टेंबर रोजी चित्रपटगृहात प्रेक्षकांच्या भेटीला येईल.
नुकत्याच झळकलेल्या ‘तीन अडकून सीताराम’ चित्रपटाच्या पोस्टरमध्ये तीन अंक दर्शवणारा एक हात दिसत असून त्या हातात बेडी दिसत आहे. तर बेडीच्या दुसऱ्या बाजुला स्माईली दिसत आहे. याचा नेमका संबंध काय, याचे उत्तर चित्रपट पाहिल्यावरच मिळेल. हृषिकेश जोशी हे नेहमीच हटके विषय हाताळतात, त्यामुळे या चित्रपटातही काहीतरी भन्नाट पाहायला मिळणार हे नक्की !
चित्रपटाबद्दल दिग्दर्शक हृषिकेश जोशी म्हणतात, ‘’संपूर्ण कुटुंबासोबत पाहावा, असा हा विनोदी चित्रपट आहे. प्रत्येक वळणावर प्रेक्षकांची उत्सुकता वाढेल. चित्रपटाचे निर्माते अतिशय ताकदीचे आहेत. त्यांनी आजवर मराठी सिनेसृष्टीला अनेक दर्जेदार चित्रपट दिले आहेत. अशा निर्मात्यांसोबत काम करताना चांगली ऊर्जा मिळते. साहजिकच त्याने उत्कृष्ट कलाकृती प्रेक्षकांसमोर सादर होते. एकंदरच चित्रपटाची संपूर्ण टीम भारी आहे. हळूहळू एक एक गोष्टी समोर येतीलच.’’