mumbai /nhi
बँक ऑफ बडोदा-मुंबई विभागीय निवड चाचणी टेबल टेनिस स्पर्धेमध्ये अंकित धीकोनियाने पुरुष गटात व कांचन चौधरीने महिला गटात अजिंक्यपद पटकाविले. आयडियल स्पोर्ट्स अकॅडमीच्या सहकार्याने ग्रँट रोड येथील वायएमसीए टेबल टेनिस हॉलमध्ये झालेल्या अंतिम सामन्यात अंकित धीकोनियाने द्वितीय मानांकित प्रसन्ना वेंकटेशचा ११-५, ११-६ असा सहज पराभव करून विजेतेपदाला गवसणी घातली. प्रथमपासून आघाडीचे वर्चस्व राखणाऱ्या अंकितचे अचूक फटके परतविण्यास अपयश आल्यामुळे प्रसन्ना वेंकटेशला यंदाही उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले.
तृतीय क्रमांकासाठी झालेली अभिजित दळवे विरुद्ध मोहित शुक्ला यामधील लढत अटीतटीची झाली. दुसऱ्या सेटमध्ये आक्रमक खेळ करीत १-१ अशी बरोबरी साधणाऱ्या मोहित शुक्लाला अखेर अभिजित दळवेने ११-५, ११-१३, ११-९ असे चकविले. महिलांच्या निर्णायक सामन्यात कांचन चौधरीने प्रार्थना मस्तुरचा ११-६, ११-६ असा सरळ दोन सेटमध्ये पराभव करून प्रथम क्रमांकावर झेप घेतली. आंतरराष्ट्रीय ख्यातीचे टेबल टेनिस पंच सीताराम गमरे, क्रीडाप्रेमी प्रदीप सुरोशे, शिवछत्रपती पुरस्कार विजेते लीलाधर चव्हाण यांनी विजेत्या-उपविजेत्यांना गौरविले. अखिल भारतीय स्तरावर होणाऱ्या बँक ऑफ बडोदा आंतर विभाग टेबल टेनिस स्पर्धेसाठी मुंबई विभागीय संघाचे प्रतिनिधित्व अंकित धीकोनिया, प्रसन्ना वेंकटेश, अभिजित दळवे, मोहित शुक्ला आणि कांचन चौधरी, प्रार्थना मस्तुर, क्लॅरेट पी. आदी टेबल टेनिसपटू करणार आहेत.