मुंबई
बँक ऑफ बडोदा-मुंबई विभागीय निवड चाचणी बुध्दिबळ स्पर्धेमध्ये राहुल कपुरेने पुरुष गटात व कोमल कदमने महिला गटात निर्विवाद वर्चस्व राखत विजेतेपदाला गवसणी घातली. स्विस लीग पाचव्या निर्णायक फेरीत विजयीदौड करणाऱ्या विकास महाडिकच्या राजाला २९ व्या चालीला जेरबंद करीत अपराजित राहुल कपुरेने पाचवा साखळी गुण वसूल केला. परिणामी द्वितीय मानांकित विकास महाडिकला तृतीय क्रमांकावर समाधान मानावे लागले. जनरल मॅनेजर श्री. मनीष कौरा, नेटवर्क डेप्युटी जनरल मॅनेजर श्री. बरून मेहेर, प्रमुख पंच सिध्देश थिक, शिवछत्रपती पुरस्कार विजेते लीलाधर चव्हाण यांच्या प्रमुख उपस्थितीत विजेत्या-उपविजेत्यांना पुरस्कार देऊन गौरविण्यात आले.
आयडियल स्पोर्ट्स अकॅडमीच्या सहकार्याने बेलार्ड पियर येथे झालेली बँक ऑफ बडोदा-मुंबई विभागीय ५२ कर्मचाऱ्यांची बुध्दिबळ स्पर्धा, स्विस लीग पध्दतीने १५-१५ मिनिटे अधिक ३ सेकंद इन्क्रिमेंटने रंगली. निर्णायक साखळी फेरीत दुसऱ्या पटावर सौरभ सिंगने (४.५ गुण) आर. के. मुलचंदानीला (३.५ गुण) १६ व्या चाली अखेर शह देत द्वितीय क्रमांकावर झेप घेतली. महिला गटामध्ये अग्रमानांकित कोमल कदमने निर्णायक फेरीत सलग तिसरा विजय नोंदविताना इंदिरा राणेच्या राजाला बाराव्या चालीत नमविले आणि विजेतेपदावर शिक्कामोर्तब केला. यावेळी आयडियल स्पोर्ट्स अकॅडमीमार्फत खेळाडूंना बुध्दिबळाचे मार्गदर्शन देखील करण्यात आले. येत्या २७ जुलैपासून भोपाळ येथे होणाऱ्या बँक ऑफ बडोदा अखिल भारतीय आंतर विभागीय बुध्दिबळ स्पर्धेसाठी राहुल कपुरे, सौरभ सिंग, कोमल कदम, इंदिरा राणे यांची बँक ऑफ बडोदा-मुंबई विभागीय बुध्दिबळ संघात निवड करण्यात आली.
*************************एए*****