मुंबई : चढाईपटू श्लोक मोरे व अंकुर पाटीलच्या खोलवर चढायांमुळे डॉकयार्ड रोड येथील रोझरी हायस्कूलने दादरच्या ताराबाई मोडक हायस्कूलचे आव्हान २२-१५ असे संपुष्टात आणले आणि आयडियल स्पोर्ट्स अकॅडमी व आयडियल गुपतर्फे रोझरी हायस्कूल सहकार्यीत आयडियल इंडोर शालेय कबड्डी स्पर्धा जिंकली. ओमकार महाडिक व अनिश पोळेकर यांनी शर्थीचे प्रयत्न करूनही ताराबाई मोडक हायस्कूलला उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले. स्पर्धेचा पारितोषिक वितरण समारंभ फादर रेव्हरंट नाईझील बॅर्रेट, सिस्टर विजया चलिल, राष्ट्रीय प्रशिक्षक व कबड्डीपटू राणाप्रताप तिवारी, कबड्डीपटू दिगंबर जाधव, शिवछत्रपती पुरस्कार विजेते लीलाधर चव्हाण यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाला.
उपांत्य फेरीच्या सामन्यात रोझरी हायस्कूल अ संघाने अँटोनियो डिसोझा हायस्कूल-भायखळा संघाचा २४-५ असा सहज पराभव करतांना विजयी संघाचे श्लोक मोरे, फरहान शेख, अंकुर पाटील चमकले. रोझरी हायस्कूल ब संघाने प्रारंभ उत्तम करूनही ताराबाई मोडक हायस्कूलने निर्णायक क्षणी १७-९ असा विजय मिळविला. आर्यन संसारे, यश जाधव, ओमकार महाडिक यांच्या चढाया ताराबाई मोडक हायस्कूलला अंतिम फेरी प्रवेशासाठी उपयुक्त ठरल्या. पराभूत संघाच्या आर्यन खरिवले, इशांत शिंदे यांनी छान खेळ केला. कबड्डी दिनानिमित्त शालेय खेळाडूंसाठी अल्पोपहारासह संपूर्णपणे मोफत इंडोर उपक्रम आयडियल स्पोर्ट्स अकॅडमीचे अध्यक्ष लीलाधर चव्हाण व कार्याध्यक्ष गोविंदराव मोहिते यांच्या संकल्पनेतून राबविण्यात आला. प्रत्येक सामन्यानंतर राष्ट्रीय प्रशिक्षक राणाप्रताप तिवारी, प्रशिक्षक प्रॉमिस सैतवडेकर, शिक्षक राम गुडमे, क्रीडा शिक्षक अविनाश महाडिक, कबड्डी मार्गदर्शक सुनील खोपकर यांचे मार्गदर्शन शालेय खेळाडूंना विशेष भावले.
******************************************************