पर्यावरणासंबंधी आव्हानांना तोंड देण्यासाठी आणि प्रभावी उपाय विकसित करण्यासाठी आसाममधील तेजपूर विद्यापीठ आणि नैनिताल येथील एआरआयईएस संस्थेसोबत पुण्याच्या आयआयटीएम’चा सामंजस्य करार; कौशल्य, स्रोत आणि संशोधन क्षमता एकत्रित करण्यासाठी या कराराचा होणार फायदा
यावेळी केंद्रीय भूविज्ञान मंत्र्यांच्या उपस्थितीत पुण्याची आयआयटीएम संस्था, आसाममधील तेजपूर विद्यापीठ आणि नैनिताल येथील एआरआयईएस संस्था यांच्यात दोन सामंजस्य करारांवर स्वाक्षऱ्या करण्यात आल्या. पर्यावरणासंबंधी आव्हानांना तोंड देण्यासाठी आणि प्रभावी उपाययोजना विकसित करण्यासाठी कौशल्य, स्रोत आणि संशोधन क्षमता एकत्रित करणे हे या भागीदारीचे उद्दिष्ट आहे. भारतीय उष्णकटिबंधीय हवामानशास्त्र संस्था (IITM), पुणे चे संचालक आणि तेजपूर, आसाम येथील तेजपूर विद्यापीठाचे रजिस्ट्रार, यांच्यातील हा सामंजस्य करार, आसाम येथील काझीरंगा राष्ट्रीय उद्यानात निरीक्षण केले जाणारे हरितगृह वायू आणि ऊर्जा प्रवाहांच्या बायोस्फियर-वातावरणाच्या देवाणघेवाणीवरील सहयोगी संशोधनाला चालना देण्याच्या दृष्टीने महत्त्वाचा ठरणार आहे. तर पुण्यातील भारतीय उष्णकटिबंधीय हवामानशास्त्र संस्थेचे (IITM) संचालक आणि उत्तराखंड, नैनिताल येथील आर्यभट्ट रिसर्च इन्स्टिट्यूट ऑफ ऑब्झर्वेशनल सायन्सेस (एआरआयईएस) या संस्थेच्या रजिस्ट्रार यांच्यातील सामंजस्य करार हा, उत्तराखंड येथील नैनिताल जवळच्या देवस्थळ येथे होणाऱ्या हरितगृह वायू आणि ऊर्जा प्रवाहांच्या बायोस्फियर-वातावरण विनिमयावरील सहयोगी संशोधनाला चालना देण्याच्या दृष्टीने महत्त्वाचा ठरणार आहे.
नॅशनल सेंटर फॉर मीडियम रेंज वेदर फोरकास्टिंग (NCMRWF) ही संस्था देखील हवामान अंदाज सांगण्याच्या कार्यात उत्कृष्ट काम करत असल्याचे पृथ्वी विज्ञान मंत्री म्हणाले. एनसीएमआरडब्ल्यूएफ ही संस्था पुण्याच्या आयआयटीएम, संस्थेची संलग्न संस्था असून तिथे हवामान संशोधन, हवामान मॉडेलिंग संबंधित संशोधनाचे कार्य चालते.
भारत लवकरच ‘हिमाद्री’ या आपल्या आर्क्टिक स्थानकाचे कामकाज पूर्णत्वाने सुरू करणार असल्याची माहितीही केंद्रीय भूविज्ञान मंत्री किरेन रिजिजू यांनी दिली.
यावेळी केंद्रीय मंत्र्यांनी विविध प्रकल्पांची माहिती दिली. ते म्हणाले की नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ ओशन टेक्नॉलॉजी, ही संस्था लक्षद्वीप येथील कावरत्ती येथे समुद्राचे खारे पाणी गोड्या पाण्यात रूपांतरित करण्यासाठी डिसॅलिनेशन प्लांट विकसित करत आहे. नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ ओशन टेक्नॉलॉजी (NIOT) चेन्नई तर्फे खोल पाण्यात चालणारे सबमर्सिबल विकसित केले जात आहे. त्याचबरोबर भूविज्ञान मंत्रालय (MoES) आणि इंडियन नॅशनल सेंटर फॉर ओशन इन्फॉर्मेशन सर्व्हिसेस (INCOIS) यांच्यातर्फे मासेमारी करणाऱ्या समुदायाला महासागरांबाबतची माहिती आणि सल्लागार सेवांबाबत मार्गदर्शन करण्यासाठी विविध ठिकाणी जागरूकता कार्यशाळा आयोजित केल्या जात असल्याचेही त्यांनी सांगितले.