NHI/प्रतिनिधी
मुंबई : बँक ऑफ बडोदा-मुंबई विभागीय संघाच्या एक दिवसीय कॅरम मार्गदर्शनासह सराव शिबिरात बेस्ट कॅरम ट्रेनीचा पुरस्कार अरविंद दपके व इंदिरा राणे यांनी पटकाविला. कॅरम सरावात्मक स्पर्धेमध्ये तृतीय मानांकित अरविंद दपकेने विजेत्या विकास महाडिकला ७-० असे तर उपविजेत्या हेमंत शेलारला ७-४ असे चकवून प्रथम स्थानावर झेप घेतली. १५ जुलै रोजी होणाऱ्या अखिल भारतीय बीओबी आंतर विभागीय कॅरम स्पर्धेमध्ये मुंबई विभागीय संघाने दर्जेदार कामगिरी करावी, या उद्देशाने जनरल मॅनेजर श्री. मनीष कौर व डेप्युटी जनरल मॅनेजर श्री.अर्शद खान यांनी प्रोत्साहनार्थ खेळाडूंसाठी सरावाचा उपक्रम साकारला.
आयडियल स्पोर्ट्स अकॅडमी सहकार्याने बेलार्ड पियर येथे झालेल्या कॅरम मार्गदर्शनासह सराव शिबिरात महिलांमध्ये बेस्ट ट्रेनीचा पुरस्कार पटकाविणाऱ्या तृतीय मानांकित इंदिरा राणे हिने देखील विजेत्या कोमल कदमला ७-४ असे आणि उपविजेत्या अर्चना विश्वकर्माला १०-० असे सहज हरवून आश्चर्याचा धक्का दिला. ज्येष्ठ पंच व कॅरमपटू प्रणेश पवार यांनी कॅरमच्या नियमांची शिबिरार्थीना सविस्तर माहिती दिली. तसेच सामनापूर्व तयारी, मानसिक संतुलन, एकाग्रता, खेळतांनाची शास्त्रोक्त बैठक आदीबाबत महत्वाचे मार्गदर्शन केले. सामना खेळतांना होणाऱ्या चुकांबाबत मार्गदर्शन करीत काही सोप्या फटक्यांची खेळी शिबिरार्थीकडून करून घेतली. परिणामी समारोपप्रसंगी झालेल्या स्पर्धेत शिबिरार्थीनी धक्कादायक विजयाच्या नोंदी केल्या. उत्कृष्ट शिबिरार्थीना पुरस्कार देऊन शिवछत्रपती पुरस्कार विजेते लीलाधर चव्हाण यांनी गौरविले.
******************************