MUMBAI/NHI : MUMBAI : सेव्हन हिल्स हॉस्पिटलच्या सुरज जाधव व अफझल शेख जोडीने ब्रीच कॅन्डी हॉस्पिटलच्या प्रदीप क्षीरसागर व अर्जुन-चीदालीया जोडीचा ६ धावांनी पराभव केला आणि लायन्स क्लब इंटरनॅशनल-मुंबईचे डीस्ट्रीक्ट गव्हर्नर डॉ. जगन्नाथराव हेगडे यांच्या वाढदिवसानिमित सुरु झालेल्या विनाशुल्क आंतर हॉस्पिटल दुहेरी विकेट क्रिकेट स्पर्धेच्या उपांत्य फेरीत प्रवेश केला. सुरज व अफझल यांच्या अचूक गोलंदाजीमुळे बलाढ्य प्रदीप-अर्जुन जोडी दोनदा बाद झाली. परिणामी ८ धावांचे विजयी लक्ष्य त्यांना कठीण झाले. आयडियल स्पोर्ट्स अकॅडमी व आयडियल ग्रुप आयोजित रुग्णालयीन दुहेरी विकेट स्पर्धेत सेव्हन हिल्स हॉस्पिटलच्या सुशांत गुरव व रोहित सोमार्डे जोडीने विजयीदौड कायम राखली.
दुसऱ्या उपांत्यपूर्व सामन्यात सुशांत गुरव व रोहित सोमार्डे जोडीने सेव्हन हिल्स हॉस्पिटलच्या इब्राहीम शेख व भावेश डोके जोडीवर ६ धावांनी विजय मिळविला. १० धावांचे विजयी लक्ष्य असतांना इब्राहीम-भावेश जोडीला सुशांत-रोहित जोडीने एकदा बाद करून विजयाचा मार्ग सोपा केला. शिवाजी पार्क मैदानात सुरज-अफजल विरुध्द ज्ञानेश्वर-रतीन आणि सुशांत-रोहित विरुद्ध सुभाष-नरेश अशा दुहेरीच्या उपांत्य लढती सोमवारी रंगतील. तसेच ५ जूनपासून होणाऱ्या विनाशुल्क आंतर हॉस्पिटल एकेरी विकेट क्रिकेट स्पर्धेत प्रदीप क्षीरसागर, मनोहर पाटेकर, डॉ. हर्षद जाधव, संदीप गुरव, डॉ. नितीन यादव, सुशांत गुरव, नरेश शिवतरकर, सुभाष शिवगण आदी नामवंत खेळाडू सहभागी झाले आहेत. तत्पूर्वी आंतर हॉस्पिटल टी-२० क्रिकेट स्पर्धेचा अंतिम सामना ब्रीच कॅन्डी हॉस्पिटल विरुद्ध सेव्हन हिल्स हॉस्पिटल यामध्ये माजी नगरपाल डॉ. जगन्नाथराव हेगडे, क्रीडापटू दीपक पडते, क्रिकेटपटू चंद्रकांत करंगुटकर, शिवछत्रपती पुरस्कार विजेते लीलाधर चव्हाण आदींच्या प्रमुख उपस्थितीत होईल.