मुंबई : ‘सागरी किनारा लाभलेल्या शहरांसमोरील आव्हाने आणि उपाययोजना’ या संकल्पनेवर आधारित या शिखर परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. ही परिषद चार सत्रात झाली. पहिल्या सत्रात ‘मित्रा’चे सीईओ प्रवीण परदेशी, नेदरलँडचे महावाणिज्य दूत बार्ट डी जोंग, इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ ट्रॉपिकल मेटिऑरॉलॉजी येथील हवामान शास्त्रज्ञ डॉ. रॉक्सी मॅथ्यू कोल यांनी हवामान बदलामुळे परिणाम होणारे समुद्रकिनारे यांची माहिती दिली.
जागतिक तापमान वाढीमुळे होणारे वातावरण बदल ही मुंबईला न्याय्य, शाश्वत, राहण्यायोग्य बनविण्याची संधी आहे. त्या दृष्टीकोनातून सर्व यंत्रणांनी पाऊले उचलली पाहिजेत, असे प्रतिपादन प्रशासकीय अधिकारी आणि ‘मित्रा’ सीईओ प्रवीण परदेशी यांनी केले. मंगळवार दि. ३० मे रोजी ताज महाल पॅलेस येथे ग्लोबल कोस्टल सिटीज समिट या कार्यक्रमाच्या पहिल्या सत्रात ते बोलत होते.
पूर्ण दिवस (सकाळी १०-संध्याकाळी६) चालेल्या या समीटमध्ये ‘मुंबई फर्स्ट’, युरोपियन युनियन, आणि नेदरलँड देश यांच्या संयुक्त विद्यमाने या परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. विविध देशांमधील समुद्र किनारपट्टीवर असलेल्या शहरांचा शाश्वत विकास कसा करता येईल यावर विचार मंथन कारणे या कार्यक्रमाचे उद्देश्य होते. जागतिक तापमान वाढीमुळे होणारे वातावरण बदलांचा परिणाम कसा कमी करता येईल यावर दिशादर्शक विचार मांडण्यासाठी विविध मान्यवरांनी सहभाग घेतला.
उद्घाटन प्रसंगी महाराष्ट्र इन्स्टिट्यूट ऑफ ट्रान्सफॉर्मेशन (MITRA)चे सीईओ प्रवीण परदेशी, बृहन्मुंबई महानगरपालिका अतिरिक्त आयुक्त (प्रकल्प) पी. वेलरासू, जपानच्या वाणिज्य दूतावासाचे महावाणिज्य दूत, डॉ. यासुकाता फुकाहोरी, मुंबईतील नेदरलँडचे महावाणिज्यदूत बार्ट डी जोंग, इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ ट्रॉपिकल मेटिऑरॉलॉजी येथील हवामान शास्त्रज्ञ डॉ. रॉक्सी मॅथ्यू कोल व इतर मान्यवर सदस्य उपस्थित होते. मुंबईच्या सांडपाण्याविषयी बोलताना परदेशी म्हणले कि “मुंबईचे सांडपाणी प्रक्रिया न करताच सोडले जाते. तसे न करता या पाण्यावर योग्य प्रक्रिया करून, ते पिण्याएतर कामांसाठी वापरले तर मुंबईला १२० किमी लांबून पाणी आणण्याची गरज नाही. आता या प्रक्रिया प्रकल्पांच्या उभारणीला गती मिळाली आहे.
तसेच, सिंगापूर देशात पिण्याच्या पाण्याची ४० टक्के मागणी ही पुनर्प्रक्रिया केलेल्या पाण्यातून पूर्ण केली जाते.” या समिटला बजाज बियॉंड, जेएसडब्ल्यू कंपनी, कॉन्कास्ट इंडिया प्रा. लि., गोदरेज आणि बॉयस, द स्टेट बँक ऑफ इंडिया आणि नॅशनल स्टॉक एक्सचेंज यांनी सहकार्य केले. तर या शिखर परिषदेसाठी नॉलेज पार्टनर्समध्ये जेएसडब्लू स्कूल ऑफ पब्लिक पॉलिसी, IIMA, आणि अरुण दुग्गल सेंटर ऑफ ESG रिसर्च, आयआयएम अहमदाबाद. यांचा समावेश होता.
सीईओ प्रवीण परदेशी म्हणाले, मुंबईतील ५०% रहिवाशी हे झोपडपट्टीत राहतात. आणि आपण एसी हॉलमध्ये बसून वातावरण बदलाच्या गप्पा मारतो. मुंबईचा विस्तार आणि विकास हा उच्चभ्रू दृष्टीकोनातून झाला. यामुळे बहुतांश झोपडपट्ट्या या मिठी नदीच्या किनारी आहेत. एकाच वेळी जोरदार पाऊस, वादळ वारा आणि चक्रीवादळ आले, तर त्याचा सर्वाधिक फटका याच लोकांना बसतो. त्यामुळे, आपण जर आडवे न वाढता, उभे वाढलो तर लोकांना घरे देखील मिळतील आणि मिठी नदीला आपला नैसर्गिक मार्ग ही कायम ठेवता येईल. त्याचबरोबर मुंबईची हवा शुद्ध ठेवण्यासाठी आणि प्रदूषण कमी करण्यासाठी आपण जास्तीत जास्त सार्वजनिक वाहतुकीचा वापर करायला हवा.