Santosh Sakpal/NHI
मुंबई- किड्स इंटेलिजन्स या शैक्षणिक क्षेत्रातील अग्रणी संस्थेतर्फे `अबॅकस तज्ज्ञ शिक्षक’ पुरस्कार सोहळा नुकताच प्रबोधनकार ठाकरे क्रीडा संकुल, विलेपार्ले पूर्व येथे पार पडला. यावेळी `अबॅकस मॅरॅथॉन’ स्पर्धेचे देखील आयोजन करण्यात आले होते. मुंबई पोलीस सायबर सेलचे निवृत्त पोलीस अधिकारी रवींद्र भिडे हे कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते. `सायबर गुन्ह्यांविषयी मुलांचे प्रबोधन आणि रक्षण’ याविषयी रवींद्र भिडे यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले. किड्स इंटेलिजन्सच्या संचालिका शुभदा भावे यांनी त्यांची मुलाखत घेतली.
यावेळी अबॅकस मॅरेथॉन स्पर्धा पार पडली. ४ ते १४ वयोगटातील चिमुकल्यांनी या स्पर्धेत सहभाग घेतला. विजेत्यांना रवींद्र भिडे यांच्या हस्ते गौरविण्यात आले. तसेच उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या अबॅकस टीचर्सना देखील रवींद्र भिडे यांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले. श्रद्धा कोंदगेकर यांना एक्सपर्ट अबॅकस टीचर २०२३, दिव्यता परब मास्टर टीचर ऑफ डी इअर-२०२३, उत्कृष्ट सहाय्यक शिक्षिका २०२३ कार्तिकी भोसले यांना, लक्ष्मी प्रसन्ना यांना रायझिंग टीचर ऑफ डी इअर २०२३, अचिव्हर टीचर ऑफ दी इअर २०२३ दिव्यश्री भास्कर यांना हे सन्मान प्रदान करण्यात आले.
यावेळी मार्गदर्शन करताना निवृत्त पोलीस अधिकारी रवींद्र भिडे म्हणाले कि,“सतर्कता आणि संयम हे दोन गुण अंगी बाळगल्यास बहुतांश सायबर गुन्ह्यांना आळा बसेल. विशेषतः आर्थिक गुन्ह्यांसंबंधी बोलताना ते म्हणाले की आपला अकाऊंट नंबर, पीन क्रमांक, पासवर्ड या खासगी गोष्टी कोणत्याही अनोळखी व्यक्तीसोबत शेअर करू नका. अशा स्वरूपाची विचारणा केल्यास शांतपणे समोरच्याला प्रश्न विचारा. आपल्या बँक प्रतिनिधींसोबत संपर्क साधून माहितीची शहानिशा करून घ्या. फेसबुकवरून येणाऱ्या अनोळखी मुलींच्या वा व्यक्तींच्या फ्रेंड रिक्वेस्ट त्वरित स्वीकारू नका. कोणत्याही अनोळखी व्यक्तीसोबत खासगी बाबी बोलू नका. सेक्सटॉर्शन सारख्या प्रकारांना घाबरू नका. समाजात बदनामी होईल म्हणून सेक्सटॉर्शन करणाऱ्या व्यक्तीच्या धमकीला बळी पडून पैसे देऊ नका.” अशा अनेक टिप्स यावेळी निवृत्त अधिकारी रवींद्र भिडे यांनी उपस्थित पालकांना दिल्या. “आपला मुलगा मोबाईलवर काय पाहतो, कोणासोबत चॅट करतो. तो एखाद्या वाईट प्रकाराला बळी तर पडत नाही ना याची वेळोवेळी खात्री करा.” अशा सूचना देखील पालकांना त्यांनी दिल्या.
अबॅकस सारख्या माध्यमातून मुलांचा उत्कर्ष व्हावा, ते सुजाण नागरिक म्हणून घडावेत हे किड्स इंटेलिजन्सचे उद्दिष्ट असे सांगत किड्स इंटेलिजन्सच्या संचालिका शुभदा भावे यांनी आभार मानले. आर्थिक सल्लागार मनिषा पाठक यांचे कार्यक्रमास मोलाचे सहकार्य लाभले.