मुंबई : सामनावीर वेदांत गोरेचे दमदार शतक व एकूण १० बळींच्या अष्टपैलू करामतीमुळे नेरूळ केंद्राने चेंबूर केंद्राचा एक डाव राखून २३ धावांनी पराभव केला आणि वरळी स्पोर्ट्स क्लब आयोजित २६ व्या अजित नाईक स्मृती १४ वर्षाखालील दोन दिवशीय एमसीए क्रिकेट स्पर्धेची सलामी लढत निर्णायक विजयाने जिंकली. धारावी केंद्राने पहिल्या दिवशी निर्विवाद विजयाकडे केलेली वाटचाल माटुंगा विभागाने दुसऱ्या डावात आक्रमक खेळ करून रोखली. तसेच ओमकार कोळीलादेखील शतक झळकवू दिले नाही. तरीही धारावी केंद्राने पहिल्या डावातील आघाडीच्या बळावर साखळी गुणांची नोंद केली.
बीएआरसी-चेंबूर खेळपट्टीवर नेरूळ केंद्राविरुध्द प्रथम फलंदाजी स्वीकारणाऱ्या चेंबूर केंद्राचा निर्णय लाभदायक ठरला नाही. वेदांत गोरेच्या (२८ धावांत ६ बळी) अचूक गोलंदाजीमुळे चेंबूर केंद्राचा पहिला डाव ४२.१ षटकात १०५ धावसंख्येवर गारद झाला. प्रत्युत्तर देतांना अष्टपैलू वेदांत गोरेचे (१३३ चेंडूत १०७ धावा) धडाकेबाज शतक व आयुष शिंदेची (६७ चेंडूत ४६ धावा) उत्तम फलंदाजी यामुळे नेरूळ केंद्राने पहिल्या डावात ६०.१ षटकात २३५ धावा फटकाविल्या. दुसऱ्या डावातदेखील वेदांत गोरेने (४७ धावांत ४ बळी) प्रभावी गोलंदाजी केल्यामुळे चेंबूर केंद्राचा संघ १०७ धावसंख्येवर गडगडला. परिणामी नेरूळ केंद्राने एक डाव राखून २३ धावांनी विजय मिळविला.
माटुंगा जिमखाना खेळपट्टीवर शतकाकडे वाटचाल करणाऱ्या ओमकार कोळीला (१४७ चेंडूत ८९ धावा) दुसऱ्या दिवशी लवकर बाद करण्यात माटुंगा केंद्राला यश लाभले. त्यामुळे धारावी केंद्राचा डाव ६५ षटकात १८५ धावसंख्येवर संपुष्टात आला. विव्हान जोबनपुत्रा ( ४९ धावांत ४ बळी) व सोहम सोनावणे (४७ धावांत ३ बळी) यांनी उत्तम गोलंदाजी केली. माटुंगा केंद्राने दुसऱ्या डावात वेद तेंडूलकर (११० चेंडूत ६४ धावा), आयुष शेटे (३७ चेंडूत ४६ धावा), शौर्य नार्वेकर (३७ चेंडूत नाबाद ३९ धावा) यांच्या दमदार फलंदाजीमुळे शेवटच्या दिवस अखेर ४ बाद १९२ धावा ठोकत धारावी केंद्राला निर्णायक विजय मिळवू दिला नाही. पहिल्या डावात २५ धावांत ८ बळी घेणारा धारावी केंद्राचा श्लोक कडव सामनावीर ठरला.
******************************