NHI/प्रतिनिधी :
मुंबई : बेस्ट क्वार्टर्स अॅलोटीज असोसिएशन-वडाळा आणि प्रशिक्षक प्रॉमिस सैतवडेकर यांच्यातर्फे आयडियल स्पोर्ट्स अकॅडमीच्या सहकार्याने २८ एप्रिल रोजी सायं. ६.०० वा. होणाऱ्या बेस्ट नवोदित वडाळा श्री किताबाच्या स्पर्धेत उदयोन्मुख शरीरसौष्ठवपटूमध्ये चुरस होणार आहे. बेस्ट जिम-वडाळा, विघ्नहर्ता जिम, राज जिम, भारत व्यायामशाळा आदी व्यायामशाळेचे नवोदित शरीरसौष्ठवपटू स्पर्धेत सहभागी होणार असल्यामुळे गत स्पर्धेप्रमाणे यंदाही वडाळा येथील बेस्ट स्टाफ क्वार्टर्स पटांगणात व्यायाम शौकीनाचा मोठा प्रतिसाद लाभणार आहे.
बेस्ट नवोदित वडाळा श्री स्पर्धेत नितीश कासेकर, ऋतिक माईन, किशन गुप्ता, आकाश चौहान, सुरज बांदल, मनीष अंजारा, रोहित बहिरे, रितिक अंजारा, चिन्मय केरळकर, संज्योत उतेकर, आकाश घाडगे आदी नवोदित शरीरसौष्ठवपटू पूर्ण तयारीनिशी उतरत आहेत. परिणामी किताब विजेता ठरविण्यासाठी राजू बने, आनंद व प्रॉमिस सैतवडेकर आदी पंचांचे कामदेखील सोपे नसेल. विजेत्यास आकर्षक पुरस्कारासह गौरविण्यात येणार आहे. तसेच मसल ब्लेझ कंपनीचे आसिफ अलियास व मन्सूर तांबोळी यांच्यावतीने विशेष पुरस्काराने सन्मान होणार आहे. स्पर्धा यशस्वी करण्यासाठी बेस्ट क्वार्टर्स अॅलोटीज असोसिएशनचे अध्यक्ष विलास पाटील, कार्याध्यक्ष महेश चव्हाण, सेक्रेटरी दिनेश कदम, नंदकुमार शेरे, उषा हांडे, प्रभाकर धांडगे, कृष्णा पडवळकर, रत्ना कसबे, विकास परब, हेमंत पाटील, विक्रम जाधव आदी मंडळी कार्यरत आहेत.