प्रतिनिधी/NHI
मुंबई : भारतातील प्रमुख बंदरातील गोदी कामगारांसाठी वेतन करार व बोनस करार त्वरित करावा, मागील वेतन कराराची थकबाकी एक रकमी द्यावी, जुनी पेन्शन योजना लागू करावी, रिकाम्या जागा त्वरित भराव्यात इत्यादी मागण्यासाठी मुंबई, कोलकत्ता, कांडला, गोवा,चेन्नई, विशाखापटनम, तुतिकोरीन, कोचीन, परादीप, न्यू मंगलोर व इतर प्रमुख बंदरातील बंदर व गोदी कामगारांनी जेवणाच्या सुट्टीत प्रचंड निदर्शने केली.
मुंबई बंदरात इंदिरा गोदीत आंबेडकर भवन समोर झालेल्या निदर्शनामध्ये ज्येष्ठ कामगार नेते ॲड. एस.के. शेट्ये यांनी आपल्या मार्गदर्शनपर भाषणात सांगितले की, मिळविलेल्या मागण्या काढून घेण्याचे काम चालू आहे, याविरुद्ध आपणास सर्वांना एकजुटीने संघर्ष करावा लागेल. मुंबई पोर्ट ट्रस्टच्या जागेवर जर झोपडपट्टी धारकांना घरे मिळत असतील तर गोदी कामगारांना घरे का मिळू नयेत. याप्रसंगी मुंबई पोर्ट प्राधिकरणाचे माजी विश्वस्त व मुंबई पोर्ट ट्रस्ट डॉक अँड जनरल एम्प्लॉईज युनियनचे जनरल सेक्रेटरी सूधाकर अपराज, युनियनचे सेक्रेटरी विद्याधर राणे, मुंबई पोर्ट प्राधिकरणाचे माजी विश्वस्त व ट्रान्सपोर्ट अँड डॉक वर्कर्स युनियनचे सरचिटणीस केरशी पारेख, सेक्रेटरी निवृत्ती धुमाळ, बबन मेटे, मुंबई पोर्ट प्राधिकरण स्थानीय लोकाधिकार समितीचे अध्यक्ष मिलिंद घनगुटकर यांची मार्गदर्शनपर भाषणे झाली. सभेचे सूत्रसंचालन मुंबई पोर्ट ट्रस्ट डॉक अँड जनरल एम्प्लॉईज युनियनचे प्रसिद्धी प्रमुख मारुती विश्वासराव यांनी केले. याप्रसंगी द्विपक्षीय वेतन समितीची बोलणी करण्यासाठी अधिकारी व कामगार व अधिकारी यांच्या पगारातील विसंगतीबाबत बक्षी उपसमितीची नेमणूक केली होती. या समितीने दिलेला अहवाल कामगार विरोधी असल्यामुळे, या बक्षी अहवालाची गोदी कामगारांनी होळी करून जाहीर निषेध करण्यात आला. सदर कार्यक्रमास मुंबई पोर्ट ट्रस्ट डॉक अँड जनरल एम्प्लॉईज युनियनचे उपाध्यक्ष निसार युनूस, शीला भगत, संघटक चिटणीस मनीष पाटील, विष्णू पोळ, प्रदीप नलावडे, मोरेश्वर कडू तसेच ट्रान्सपोर्ट अँड डॉक वर्कर्स युनियनचे पदाधिकारी विनोद पितळे,बापू घाडीगावकर,निवृत्ती भटकळ तसेच कामगार व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.