प्रतिनिधी/NHI
मुंबई : माझगाव क्रिकेट क्लब आयोजित मुंबई क्रिकेट असोसिएशन मान्यतेच्या पहिल्या नवी मुंबई प्रीमियर लीग-एनएमपीएल क्रिकेट स्पर्धेमध्ये ठाणे टायगर्सने लागोपाठ दुसरा साखळी सामना जिंकला. विकी पाटीलचे नाबाद अर्धशतक व हेमंत बुचडेचे प्रमुख तीन बळी, यामुळे ठाणे टायगर्सने वाशी वॉरीयर्सला ७ विकेटने नमवून विजयी कूच कायम राखली. धुमील मटकर, हृषीकेश पवार आदी खेळाडूंनी वाशी वॉरीयर्सचा पराभव टाळण्यासाठी शर्थीचे प्रयत्न केले. ठाण्याचे माजी महापौर अशोक वैती यांनी विकी पाटीलला सामनावीर पुरस्काराने सन्मानित केले. याप्रसंगी एनएमपीएलचे चेअरमन शाह आलम शेख, प्रदीप कासलीवाल, अभिजित घोष आदी उपस्थित होते. दुसऱ्या सामन्यात मीरा-भाईंदर लायन्सने बेलापूर ब्लास्टर्सचा ६ विकेटने पराभव करून पहिला साखळी विजय नोंदविला.
दादोजी कोंडदेव स्टेडीयमवर ठाणे टायगर्सने नाणेफेक जिंकून वाशी वॉरीयर्सला प्रथम फलंदाजी दिली. सलामीवीर हृषीकेश पवार (३२ चेंडूत ३१ धावा, १ षटकार व ३ चौकार), धुमील मटकर (३४ चेंडूत नाबाद ४७ धावा, ३ षटकार व १ चौकार), प्रसाद पवार (१४ चेंडूत २७ धावा, २ षटकार व २ चौकार) यांनी दमदार फलंदाजी केल्यामुळे वाशी वॉरीयर्सने मर्यादित २० षटकात ६ बाद १४८ धावांचा टप्पा गाठला. हेमंत बुचडेने २९ धावांत ३ बळी घेतले. विजयी लक्ष्याचा पाठलाग करताना चौथ्या चेंडूवर ठाणे टायगर्सची सलामी जोडी फुटली.
त्यानंतर मात्र वाशी वॉरीयर्सच्या गोलंदाजीला आक्रमकपणे सामोरे जात परीक्षित वालसंगकर (३९ चेंडूत ४२ धावा, १ षटकार व ४ चौकार) व विकी पाटील (५४ चेंडूत नाबाद ६६ धावा, ४ षटकार व ३ चौकार) यांनी चौकार-षटकारांची आतषबाजी केली आणि ठाणे टायगर्सचा लागोपाठ दुसरा विजय १९.५ षटकात ३ बाद १४९ धावसंख्या फटकावीत रचला. मीरा-भाईंदर लायन्स विरुद्धच्या दुसऱ्या सामन्यात प्रारंभ निराशाजनक होऊनही मधल्या फळीतील फलंदाज आकाश पारकर (३५ चेंडूत नाबाद ५१ धावा, ३ षटकार व २ चौकार) व चिन्मय सुतार (३८ चेंडूत ४९ धावा, २ षटकार व ३ चौकार) यांनी बेलापूर ब्लास्टर्सचा डाव सावरला. त्यामुळे त्यांनी २० षटकात ६ बाद १४५ धावांची मजल मारली. प्रत्युत्तरादाखल सामनावीर ऋग्वेद मोरे (५९ चेंडूत नाबाद ७३ धावा, २ षटकार व ४ चौकार) व सृजन आठवले (२५ चेंडूत ३१ धावा, १ षटकार व ४ चौकार) यांनी सलामीला विजयी पाया रचला. परिणामी बेलापूरविरुध्द मीरा-भाईंदर लायन्सने १८.५ षटकात ४ बाद १४६ धावा ठोकत पहिला साखळी विजय साकारला.