मुंबई : माझगाव क्रिकेट क्लब-मुंबईतर्फे मुंबई क्रिकेट असोसिएशन मान्यतेने पहिल्या नवी मुंबई प्रीमियर लीग क्रिकेट स्पर्धेचे २८ फेब्रुवारीपासून आयोजन करण्यात आले आहे. रणजीपटूंसह दर्जेदार युवा क्रिकेटपटूंचा भरणा असलेल्या आठ संघांमध्ये सुपर लीग क्रिकेटचे २८ सामने व बाद पद्धतीचे ३ सामने १५ मार्चपर्यंत दररोज ठाण्यातील दादोजी कोंडदेव स्टेडीयमवर रंगणार आहेत. कल्याण टस्कर्स विरुध्द वाशी वॉरीअर्स यामधील उद्घाटनीय लढत मुंबई क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष अमोल काळे व द्रोणाचार्य पुरस्कार विजेते दिनेश लाड यांच्या प्रमुख उपस्थितीत होईल.
कल्याण टस्कर्स संघामध्ये जावेद खान, जपजीत सिंग, हरदेव तांडेल; वाशी वॉरीअर्समध्ये अतुल सिंग, सिध्दांत सिंग, निखील पाटील; अंबरनाथ अवेन्जर्समध्ये आकीब शेख, प्रशांत सोळंकी, वेदांत खांबे; कोपरखैराणे टायटन्समध्ये अरुण यादव, सर्फराज, रमनप्रीत सिंग; बेलापूर ब्लास्टर्समध्ये चिन्मय सुतार, श्रेयस गुरव, प्रभाकर निशाद; सानपाडा स्कॉर्पियन्समध्ये आकाश सावला, अथर्व डाकवे, झिद पाटणकर; ठाणे टायगर्समध्ये साहिल गोडे, श्रीराज घरत, दशरथ चव्हाण आणि मीरा-भाईंदर लायन्समध्ये ऋग्वेद, जहांगीर खान, श्रीदीप मांगेला आदी उदयोन्मुख खेळाडूंचा समावेश आहे.
साखळी सामन्यांमध्ये आठही संघ एकमेकाविरुद्ध झुंजणार असून सर्वाधिक साखळी गुण घेणारे पहिले चार संघ १४ मार्च रोजी होणाऱ्या उपांत्य फेरीत प्रवेश करतील. अंतिम सामना व पारितोषिक वितरण समारंभ १५ मार्च रोजी होईल. स्पर्धा यशस्वी करण्यासाठी संघटन समितीचे अध्यक्ष शहालम शेख, लीग कमिशनर प्रदीप कासलीवाल, अनुज बन्सल, विर्रेण जेठवा, अभिजित घोष, भूपेंद्र सिन्हा, विनोद भानुशाली, जीत यादव, आशिष सावंत, नितीन सावंत, रामदास भोईटे आदी मंडळी कार्यरत आहेत.