प्रतिनिधी/मुकुंद रांजाणे
माथेरान : आपल्या न्याय हक्काच्या रस्त्यासाठी वन ट्री हिल रहिवाशांनी दि.२४ रोजी श्रीराम चौकात लाक्षणिक उपोषण केले होते.सायंकाळी चार वाजता मुख्याधिकारी सुरेखा भणगे यांनी येत्या २ मार्च पर्यंत अभियंत्यांना विचारून रस्त्याच्या कामाला सुरुवात केली जाईल असे आश्वासन दिल्यानंतर या उपोषणाची सांगता करण्यात आली आहे.
अनेक वर्षांपासून वन ट्री हिल रहिवाशांना चालण्या योग्य रस्ता उपलब्ध नव्हता. मागील सत्ताधारी शिवसेनेच्या गटाने या रस्त्याबाबत ठराव सुध्दा केलेला होता.सर्व माल येऊन पडलेला असताना अद्यापही ह्या रस्त्याच्या कामाला सुरुवात झालेली नाही.घोडेवाल्यांच्या विरोधामुळे ह्या रस्त्याचे काम बंद करण्यात आले आहे. त्यामुळे नाईलाजाने येथील रहिवाशांना उपोषणाचे हत्यार उपसावे लागले आहे.अनेक वयोवृद्ध मंडळींनी आपल्या लहान मुलांना सोबत घेऊन या उपोषणात आपला सहभाग नोंदवला. याची दखल घेत मुख्याधिकारी भणगे यांनी उपोषण स्थळी भेट दिली असता आम्हाला काही तांत्रिक अडचणींमुळे काम करता येत नाही असे सांगितले असता सर्व उपोषण कर्त्यांनी संताप व्यक्त करत आम्हाला आमच्या हक्काचा रस्ता लवकरच बनवून द्यावा अन्यथा पुढे आम्ही आमरण उपोषण करू. अशा संतप्त प्रतिक्रिया दिल्या आहेत. दरम्यान या रहिवाशाना सर्व स्तरातील राजकीय, सामाजिक क्षेत्रातील त्याचप्रमाणे विविध संस्थेच्या पदाधिका-यांनी व्यापारी वर्गाने,पालक वर्गाने सुध्दा जाहीर पाठिंबा दिला होता.गावातील अन्य रस्त्यांची कामे युद्धपातळीवर सुरू असताना आमच्या रस्त्याबाबत ठोस भूमिका नगरपरिषदेच्या अधिकारी वर्गाने घेतली नाही. आम्हाला पोकळ आश्वासने दिली जात आहेत. कच कॅसल ते गुलस्थान बंगला आणि वखारी नाका ते छत्रपती शिवाजी महाराज रोड पर्यंत नियोजित क्ले पेव्हर ब्लॉकचाच रस्ता लवकरात लवकर बनवून द्यावा. जांभ्या दगडात बनविलेले रस्ते कशापद्धतीने असतात याचा अनुभव मागील काळात आलेला आहे त्यामुळेच क्ले पेव्हर रस्ते हे धुळविरहीत असून चालण्या योग्य असतात. पावसाळ्यात जांभ्या दगडांच्या रस्त्यांची दयनीय अवस्था निर्माण होऊ शकते यासाठी क्ले पेव्हर रस्ते अधिक काळ टिकू शकतात.आम्ही सुध्दा नगरपरिषदेचे सर्व कर वेळेत भरत असतो मग आमच्या न्याय हक्कावर गदा आणण्याचा प्रयत्न करू नये. असेही संतप्तपणे उपोषण कर्ते बोलत होते.यावेळी रवींद्र परब, वैभव परब, आशिष परब, विनोद कदम,माजी नगरसेविका प्रियांका कदम, कीर्ती मोरे,दीप्ती कदम, किशोर ढोले, रूपाली ढोले नीता पटेल, सुप्रिया कदम, उमेश कदम, कल्पना पाटील, मनोहर चाळके, संगीता चाळके, नारायण कदम, नलिनी कदम, दिलीप कदम, दिपाली कदम, अविनाश परब, अनिता परब, अविनाश गोरे, धनवंती गोरे, राजू कदम, सुषमा कदम, नीता शिंदे, भरत शिंदे, मदन पाटील, नकोशा पाटील, कुंदा निचींदे, मरगजे मावशी, कुसुम परत, संगीता भस्मा, शितल पारधी, अमित भस्मा, परेश सुर्वे, पराग सुर्वे, अनिता सुर्वे, गीता खाडे, सुभाष सावंत,भारती कदम, रघुनाथ कदम, राजनाथ तिवारी, पुष्पा देवी तिवारी,अंजू केरेकर, संजय भोसले, पनी भोसले,कमल सकपाळ,योगेश शिंदे, सचिन भस्मा आदी रहिवाशांनी या लाक्षणिक उपोषणात आपला सहभाग नोंदवला.
माथेरानचे दक्षिण टोक असलेला वन ट्री हिल विभाग सर्व सुख सुविधांपासून वंचित असतो.कशाप्रकारे जीवन जगत आहोत याची सुतराम कल्पना कदाचित नगरपालिका अधिकाऱ्यांना नसावी.आमच्या भागातील काही राजकीय लोक सुध्दा अप्रत्यक्षपणे यात खोडा घालण्याचा प्रयत्न करत आहेत. परंतु आमच्या रस्त्यांची ही न्याय्य मागणी लवकरच पूर्ण केली नाही तर नाईलाजाने आम्हाला नगरपरिषदेच्या गलथान कारभारा बाबतीत आमरण उपोषण करण्या शिवाय पर्याय उरणार नाही.
कल्पना पाटील — वन ट्री हिल विभाग रहिवासी