MUMBAI : ओम्नी ट्रॉफी आंतर हॉस्पिटल सी डिव्हिजन टी-२० क्रिकेट स्पर्धेच्या अंतिम फेरीत ब्रीच कॅन्डी हॉस्पिटलने प्रवेश करतांना बलाढ्य सायन हॉस्पिटल संघाला ४४ धावांनी पराभूत केले. सलामीवीर रोहन महाडीकची दमदार अर्धशतकी फलंदाजी व कप्तान प्रदीप क्षीरसागरची अष्टपैलू कामगिरी, यामुळे दोलायमान विजयाचे पारडे ब्रीच कॅन्डी हॉस्पिटलच्या बाजूने झुकले. शिवाजी पार्क-माहीम ज्युवेनाईल खेळपट्टीवर सलामीवीर संदीप चौधरी व संभाजी थोरात यांची दुसऱ्या विकेटसाठी विजयासमीप नेणारी शतकी धावांची भागीदारी सायन हॉस्पिटल संघाला अखेर लाभदायक ठरली नाही.
आयडियल स्पोर्ट्स अकॅडमी, आयडियल ग्रुप व ओम्नी ग्लोबल स्पोर्ट्स मॅनेजमेंट आयोजित सी डिव्हिजनच्या उपांत्य फेरीत सायन हॉस्पिटलने नाणेफेक जिंकून ब्रीच कॅन्डी हॉस्पिटलला प्रथम फलंदाजी दिली. सलामीवीर रोहन महाडिक (४७ चेंडूत ७९ धावा, ११ चौकार) व कप्तान प्रदीप क्षीरसागर (३२ चेंडूत ३७ धावा, ५ चौकार) यांनी ९४ धावांची सलामी भागीदारी करून ब्रीच कॅन्डी हॉस्पिटलचा प्रारंभ भक्कम केला. त्यानंतर प्रफुल मारू (२३ चेंडूत २३ धावा), अरुण पारचा (१७ चेंडूत नाबाद २६ धावा) व सतेंद्र कुमार (४ चेंडूत १४ धावा) यांनी उत्तम साथ दिल्यामुळे ब्रीच कॅन्डी हॉस्पिटलने २० षटकात ३ बाद १९५ धावांचा डोंगर उभा केला. सुभाष कदमने २३ धावांत २ बळी घेतले. सायन हॉस्पिटलच्या धावांचे खाते उघडण्यापूर्वीच मध्यमगती गोलंदाज सुदेश यादवने तिसऱ्या चेंडूवर सलामी जोडी फोडली. तरीही न डगमगता संदीप चौधरी (३३ चेंडूत ४८ धावा, १ षटकार व १ चौकार) व संभाजी थोरात (५५ चेंडूत ५७ धावा, ६ चौकार) यांनी दुसऱ्या विकेटसाठी ११५ धावांची भागीदारी केली. परंतु प्रदीप क्षीरसागरच्या (३२ धावांत ३ बळी) अचूक फिरकी गोलंदाजीमुळे सायन हॉस्पिटलचा डाव २० षटकात ५ बाद १५१ धावसंख्येवर संपल्यामुळे ब्रीच कॅन्डी हॉस्पिटलने बाजी मारली. रोहन महाडिक व संभाजी थोरात यांना सामन्यातील उत्कृष्ट खेळाडूचा पुरस्कार देऊन क्रिकेटपटू चंद्रकांत करंगुटकर, प्रदीप क्षीरसागर व शिवछत्रपती पुरस्कार विजेते लीलाधर चव्हाण यांनी गौरविले.