मुकुंद रांजाणे (माथेरान ) : पर्यटकांना, शालेय विद्यार्थ्यांना, जेष्ठ नागरिकांना,दिव्यांगांना सुरक्षित आणि स्वस्त दरात प्रवासी वाहतूकीची सेवा उपलब्ध करून देण्यासाठी ई रिक्षाचा एकमेव पर्याय प्राप्त झाला आहे. स्थानिकांची अनेक वर्षांपासूनची ई रिक्षाची मागणी होती.ती ५ डिसेंबर २०२२ रोजी पूर्ण झाली आहे. याकामी सुप्रीम कोर्टाने दिलेल्या निर्देशानुसार माथेरान मधील काही भागात असणाऱ्या ओबडधोबड रस्त्यावर कोणत्या कंपनीची ई रिक्षा चांगल्या प्रकारे प्रवाशांना सेवा देऊ शकते यासाठी ५ डिसेंबर २०२२ ते ५ मार्च २०२३ पर्यंत पायलट प्रोजेक्ट सुरू केला होता त्यास शालेय विद्यार्थ्यांसह,पर्यटकांनी त्याचप्रमाणे स्थानिकांनी ज्यामध्ये ई रिक्षाला प्रामुख्याने विरोध करणाऱ्या मंडळींनी सुध्दा या सेवेचा चांगल्या प्रकारे लाभ घेतला आहे.त्यामुळे हे एक अत्यावश्यक सुविधा पुरविणारे उत्तम साधन असल्यामुळे सर्वांनाच ई रिक्षा आता हवीहवीशी वाटू लागली आहे.
५ डिसेंबर २०२२ ते १७ फेब्रुवारी २०२३ या कालावधीत जवळपास ५१३५० प्रवाशांनी प्रवास केला आहे यामध्ये शालेय विद्यार्थी एकूण ७९०० तर अन्य ४३४५० प्रवाशांनी याचा लाभ घेतला आहे.शालेय विद्यार्थ्यांना केवळ दहा रुपये तर अन्य प्रवाशांना दस्तुरी ते रेल्वे स्टेशन पर्यंत प्रति ३५ रुपये एवढ्या माफक दरात स्वस्त आणि सुरक्षित प्रवास करता येत आहे.
माथेरान हे देशातील असे पर्यटनस्थळ आहे की, ज्याठिकाणी मानवचलीत हातरिक्षा आणि घोडे हीच प्रमुख वाहने आहेत. केवळ पर्यावरणाचा ऱ्हास होऊ नये यासाठी इथे पूर्वीपासून मोटार वाहनांना बंदी घालण्यात आली होती परंतु आधुनिक युगाप्रमाणे पर्यावरण पूरक ई रिक्षा सारखे छोटे छोटे बदल,परिवर्तन हे पुढील यशस्वी यशाची गुरुकिल्ली असतात. अल्पावधीतच इथल्या स्थानिकांना,शालेय विद्यार्थ्यांना त्याचप्रमाणे पर्यटकांना सुध्दा ई रिक्षाची सवय लागली आहे. क्रिकेटप्रेमी सुध्दा दूरवर असणाऱ्या खेळाच्या मैदानावर जाण्यासाठी या वाहनांची वाट पहात असतात. काही बंगल्याचे माळी सुध्दा या सेवेचा नियमितपणे लाभ घेत आहेत. नगरपालिका कर्मचारी वर्ग,शिक्षक,वैद्यकीय अधिकारी तसेच अन्य काही शासकीय खात्यांची मंडळी सुद्धा दररोज याचा वापर करीत आहेत.या प्रोजेक्टला ५ मार्च रोजी तीन महिने पूर्ण होत आहेत त्यामुळे पुढे हा प्रोजेक्ट सुरू राहणार आहे की नाही याबाबत साशंकता निर्माण झाली आहे. ई रिक्षाचे समर्थन करणारा सर्वाधिक वर्ग या सेवेचा लाभ घेत असून अशीच कायमस्वरूपी ही सेवा सुरू राहावी आणि ई रिक्षाच्या संख्येत लवकरच वाढ करावी अशी मागणी जोर धरू लागली आहे.
—————————— —————————
मा सर्वोच्च न्यायालयाने दि 12 मे च्या आदेशात स्पष्ट उल्लेख केला आहे माथेरानच्या हातरिक्षा चालकांसाठी ई रिक्षा सुरू करण्यासाठी राज्य सरकार कोणत्या उपाययोजना करीत आहे याची माहिती प्रतिज्ञा पत्राद्वारे कोर्टाला द्यावी तसेच कोणत्या कंपनीची ई रिक्षा सक्षमपणे धावू शकते याचा अभ्यास करण्यासाठी तीन महिन्यांच्या पायलट प्रोजेक्ट साठी देखील कोर्टाने परवानगी दिली आहे राज्य सरकारने फेब्रुवारी 2018 मधे केंद्राच्या पर्यावरण खात्याकडे ई रिक्षा सुरू करण्याची परवानगी मागितली होती त्यावेळी त्यांनी सुप्रीम कोर्टाकडून परवानगी घ्यावी असे सांगितले होते या कोर्टाच्या आदेशानुसार ई रिक्षा साठी परवानगी देण्यात आली हे स्पष्ट होते त्यामुळे ही सेवा बंद करण्याचा प्रश्नच येत नाहीसुनिल शिंदे, सुप्रीम कोर्टातील याचिकाकर्ते